Thursday, May 17, 2018

शहरे, शहरीकरण, शहरी विकास - लेखांक ४ - आजची शहरे घडविणारे वैज्ञानिक शोध / तंत्रज्ञान – सायकल – दुचाकी


शहरे, शहरीकरण, शहरी विकास - लेखांक ४ - आजची शहरे घडविणारे वैज्ञानिक शोध / तंत्रज्ञान – सायकल – दुचाकी[1] [2]

आजच्या शहरांची आणि शहरीकरणाची जडण घडण (मुख्यत्वे १९ व्या आणि २० व्या शतकात) सायकल  मुळे शक्य झाली असे म्हटले तर अनेकांना आश्चर्य वाटेल, अनेकांचा विश्वास बसणार नाही पण ज्यांनी सायकलचा उपयोग दिवसरात्र वाहतुकीचे साधन म्हणून केला आहे अथवा आजही करीत आहेत (जगात आजही दोन अब्ज सायकली वापरात आहेत)  आणि शहरात वाढणाऱ्या वाहतूक समस्येचा, प्रदूषणाचा उपाय म्हणून जे सायकल वापराकडे वळत आहेत, “अधिकाधिक सायकल वापरा” - असे सर्वांना सांगत आहेत त्या सर्वांना हा लेख पटणार आहे.  

शहरातील वाहतुकीची आणि प्रदूषणाची समस्या कमी करण्यासाठी जगभर लोकांनी सायकल अधिकाधिक वापरावी ह्या साठीची मोहीम गेल्या काही वर्षापासून सुरु झाली आहे. काही देशांचे पंतप्रधान, मंत्री, उच्च सरकारी अधिकारी, सामाजिक आणि इतर प्रसिद्ध व्यक्ती स्वतः सायकल नेमाने चालवून सायकल वापराला प्रोत्साहन देत आहेत. मधल्या काळात मोटर गाड्यांसाठी शहरातील रस्त्यांची संरचना (design) अशी काही बदलण्यात आली की सायकल वापरणेच अशक्य होऊन बसले आहे आणि त्यामुळे सायकलचे चे वाहतुकीचे साधन म्हणून उच्चाटनच झाले. मात्र “सायकल वापरा” ही जी नवी चळवळ सुरु झाली आहे जगभर, त्यामुळे रस्त्यांची संरचना / डिझाईन पुन्हा बदलून त्यांत सायकल चालवण्यासाठी आरक्षित, स्वतंत्र मार्गाची व्यवस्था करण्यात येत आहे. २०१६ केलेल्या लोकमत चाचणी मध्ये अमेरिकेतली ७० टक्के महापौरांनी सायकलींसाठी स्वतंत्र रस्ते बांधण्याचा मनोदय व्यक्त केला.

भारत सरकारने २०१५ साली १०० शहरांत स्मार्ट सिटी योजना सुरु केली आहे त्यामध्ये शहरामध्ये लोकांना वाहतुकीसाठी सायकलचा वापर करता यावा, तो  वाढावा ह्या साठी रस्त्यांची डिझाईन बदलण्याचे/  करण्याचे प्रकल्प घेण्याच्या आणि सायकल शेअरिंग (Bike Sharing) ची व्यवस्था सुरु करण्याच्या  सूचना देण्यात आल्या आहेत आणि म्हणून आज भारतातील शहरांमध्ये रस्त्यांची रचना बदलण्याचे आणि लोकांना सहजपणे सायकल भाड्याने घेता यावी ह्यासाठी सायकल शेअरिंग चे कार्यक्रम सुरु झाले आहेत. खाजगी क्षेत्राच्या सहयोगाने सायकल शेअरिंग व्यवस्था सुरु करण्यात पुणे, नाशिक, साल्ट लेक सिटी, भोपाळ इत्यादि शहरे आघाडीवर आहेत. ओला, उबेर सारख्या भाड्याने सायकल पुरविणाऱ्या ऑनलाईन कंपन्या आणि त्यासाठीची मोबाईल अॅप्लीकेशन्स पण निर्माण झाली आहेत.

Figure 1 - Wooden draisine (around 1820), the first 
two-wheeler and as such the archetype of the bicycle 
By Gun Powder Ma - Own work, CC BY-SA 3.0, https:// 
commons.wikimedia.org/w/index.php?curid=4406665
खरे पाहता एके काळी सायकल घेण्याची ऐपत नसणाऱ्यांना अथवा फार कमी वेळा साठी तिची गरज असणाऱ्याना, सायकल शिकणाऱ्या छोट्या-मोठ्या मुलांना भाड्याने सायकल देण्याचा धंदा ज्याला आज सायकल अथवा बाईक शेअरिंग असे नवे दिले मिळाले आहे सर्व शहरांत मोठ्या प्रमाणात चालत होता आजही काही प्रमाणात काही ठिकाणी चालतो तर मग ह्या नव्या सायकल शेअरिंग व्यवस्थेत नवे काय आहे? नवे एवढेच आहे की आधीच्या पद्धतीत सायकल ही ओळखीच्या दुकानदाराकडून मिळत असे आणि ज्याच्याकडून भाड्याने घेतली त्याला ती त्याच्या जागी परत आणून द्यावी लागत असे.  नव्या व्यवस्थेत ती शहरांत जागोजागी उभ्या केलेल्या सायकल स्थानकावरून घेता येते आणि आपले काम झाले की शहरातील कुठल्याही स्थानकावर सोडता येते आणि हे सारे आपल्या हातातील स्मार्ट फोन ने करता येते!! म्हणजे सायकल वर अंकित QR कोड स्मार्ट फोन मध्ये दाखल करून घेता सायकल चे कुलूप उघडते आणि तुम्ही जेंव्हा सायकल सोडता तेंव्हा तिचे भाडे आपोआप चुकवले जाते, तिला कुलूप लागते इत्यादि. अर्थात जिथे अशी प्रगत व्यवस्था नसते तेथे सायकल स्थानकावर माणसाची नेमणूक केलेली असते आणि त्याच्या कडून ही सायकल देता आणि घेता येते. अशा प्रकारे सायकल वापरासाठी मिळण्याची सहज, सोपी सर्वांना परवडेल अशी व्यवस्था अनेक शहरांमध्ये निर्माण झाली आहे आणि वेगाने निर्माण होत आहे.

किती मजेशीर आहे ना हा सारा प्रकार, एके काळी ज्या सायकल ने शहरांची वाढ सुकर केली, शक्य केली तीच सायकल मध्ये नकोशी झाली, मागे टाकली गेली आणि आता आजच्या आपल्या शहरांना वेगळ्या प्रकारे घडवत आहे!!! अर्थात पहिल्या लेखात मांडल्या प्रमाणे आणखी २० वर्षानंतर सारीच वाहने प्रदूषण रहित सौर ऊर्जेने चालणारी झाली, अधिक गतिमान सार्वजनिक वाहतूक निर्माण झाली आणि लोकांची एकूणच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरजच कमी झाली तर कदाचित सायकलला जे महत्त्व सध्या नव्याने येऊ लागले आहे ते उरणार नाही पण १९ व्या शतकाच्या शेवटच्या भागात आणि २० व्या शतकाच्या पूर्वार्धात सायकल मुळे शहरे कशी शक्य झाली, शहरे कशी वाढली – घडली ते पाहूया ........

Figure 2 - A penny-farthing or ordinary Bicycle 
photographed in the Škoda Auto 
museum in the Czech Republic



इ.स. १८१७ साली जर्मनी मध्ये पहिली दुचाकी अवतरली, बरोन कार्ल द्रिस (Karl Drais) ह्याने ती बनवली होती आणि तिला रनिंग मशीन असे नाव दिले होते. ही दुचाकी लोखंडाची जड फ्रेम, लाकडी चाके आणि सायकल वर बसून पायाने जमिनीला किक मारून चालणारी होती (पहा आकृती १). पॅडल्स च्या तंत्रज्ञानाचा शोध १८६० च्या सुमारास लागला. इ.स. १८६८ मध्ये ह्या दुचाकी साठी बायसिकल आणि तिचाकी साठी ट्रायसिकल हा शब्द इंग्रजी मध्ये रूढ झाला. 

पॅडल्स आणि चेनचे तंत्रज्ञान वापरून १८६८ च्या सुमारास फ्रान्स मध्ये पेनी-फार्दिंग (penny-farthing) म्हणजेच ordinary cycle असे नामकरण केलेली सामान्य सायकल निर्माण करण्यात आली. मागचे छोटे चाक - पुढचे चाक खूप मोठे, , त्यावर बसवलेली सीट अशी ही दुचाकी पॅडल्स  येऊनही चालवणे खूपच पीडा कारक होते म्हणून हिला हाडे खिळखिळी करणारी (boneshakers) असे म्हटले जायचे (पहा आकृती २).

Figure 3 - 1886 Rover safety bicycle at the British 

Motor Museum. The first modern bicycle, it 

featured a rear-wheel-drive, chain-driven cycle with 

two similar sized wheels. Dunlop's pneumatic tire 
was added to the bicycle in 1888
आज जरी सायकल चे तंत्रज्ञान सोपे वाटत असले तरी त्याच्या प्रत्येक भागासाठी पॅडल्स, चेन, फ्रेम, ब्रेक्स, हॅन्डल्स, चाक अनेक प्रकारची संशोधने होत राहिली आणि  दुचाकी मध्ये अनेक सुधारणा होत राहिल्या, निरनिराळी स्वरूपे ती घेत राहिली आणि ह्या साऱ्या साठी जवळजवळ ७० वर्षे लागली .

शेवटी इ.स. १८८५ मध्ये जवळजवळ आज असते त्या स्वरुपाची डायमंड आकाराची फ्रेम, दोन्ही चाके सारख्या मापाची, पॅडल्सचा आणि चेनचा उपयोग करून मागचे चाक चालवणारी अशी सुरक्षित सायकल (safety bicycle) १८८५ च्या सुमारास ब्रिटीश संशोधक जे. के. स्टारले याने तयार केली आणि पाठोपाठ १८८८ ला स्कॉटीश संशोधक डनलॅाप ह्याने हवा भरलेले टायर तयार केले ज्याचा उपयोग करून ही दुचाकी परिपूर्ण झाली (पहा आकृती ३).

मोटर आधारित गाड्या (ऑटोमोबाईल) विकसित होऊन त्यांनी वाहतुकीचे मुख्य साधन म्हणून जागा घेण्याआधी सायकल ने एक प्रकारची वाहतूक क्रांतीच घडवली. सुरवातीला उच्चभ्रू लोकांनी शौक /छंद म्हणून जरी तिचा अवलंब केला तरी एकदा सायकलचे व्यापारी तत्वावर ठोक उत्पादन शक्य झाल्यावर आणि सुरु झाल्यावर काही काळातच ती सर्वसामान्यांचे वाहन ठरली.  एवढेच नव्हे तर सायकलच्या शोधामुळे आणि नंतर वापरामुळे अनेक इतर वैज्ञानिक आणि तांत्रिक शोधांना चालना मिळाली, मोटर गाडी (ऑटोमोबाईल) चा विकास सायकल साठी शोधलेल्या बॉल बेरिंग्स, हवेच्या दाबावर चालणारे टायर्स, स्पोक्स आधारित चाके, चेन इत्यादि मुळे शक्य झाला. सर्वात महत्वाचे म्हणजे देशांच्या अर्थकारणाला ही वाढ मिळाली. अनेक कंपन्या निघाल्या आणि त्यांच्यामध्ये जाहिरात युद्ध ही मोठ्या प्रमाणात घडले (पहा आकृती ४).


Figure – 4 - an ad for Starley's Rover brand).Wiki Commons
सायकल हे माणसाने बनवलेले मनुष्य बळाचा अत्यंत कार्यक्षम वापर करणारे यंत्र आहे. पॅडल्सला व्यक्ति जेवढी शक्ती लावते त्याच्या ९९ टक्के शक्तीचे गती शक्ती मध्ये रुपांतर होते. सर्वसामान्य पणे माणूस तासाला ३ ते ५ की. मी. ह्या वेगाने चालतो. माणूस सहजपणे चालताना जेवढी शक्ती वापरतो तेवढीच शक्ती वापरून सायकल ने तासाला १५ की. मी. वेगाने जाऊ शकतो म्हणजेच सायकलमुळे त्याची कार्यक्षमता तिप्पट होते आणि म्हणूनच सायकल इ.स. १९०० सुमारास मध्यम वर्ग आणि कामगार वर्गाच्या हातात पोचली आणि ह्या सर्व व्यक्तींची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची शक्ती वाढली, स्वतंत्रता वाढली, स्वावलंबिता वाढली. सायकल येण्या आधी एक तर घोडा, खेचर हे व्यक्तिगत वाहतुकीचे साधन होते किंवा घोड्यांनी ओढलेल्या छोट्या – मोठ्या गाड्या (आपल्या येथे बैलगाड्या) सामायिक वाहतुकीचे साधन होत्या.

सायकल आली आणि व्यक्तीच्या हातात (किंवा पायात !!) यंत्र शक्ती आली, त्याला दळणवळणाचे अकल्पित आणि अमर्याद साधन मिळाले.  तो जेवढे चालून शहर फिरू शकत असे त्याच्या तिप्पट किंवा त्याहून अधिक मोठे शहर फिरणे शक्य झाले. सायकलमुळे त्याचे दररोजचे विश्व तिप्पट आकाराचे करणे शक्य झाले म्हणजेच  लोकांना शहराच्या मुख्य विस्तारापासून थोड्या दूर अंतरावर राहणे वा कामासाठी दूर अंतरावर जाणे शक्य झाले आणि ह्यामुळेच त्यावेळच्या शहरांचे वाढणे, मोठे होणे शक्य झाले. 

Figure 5 - Firefighter bicycle- By Pivari.com - 
Own work, CC BY-SA 3.0, https://commons.
सायकलमुळे दुसरा फरक पडला तो रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्याचा. सायकल मुळे १८७० च्या सुमारास अनेक क्लब उदयास आले आणि त्यांनी चांगल्या रस्त्यांची मागणी सुरु केली, आंदोलने केली आणि जेंव्हा सायकलीचा मोठ्या प्रमाणात वापर शक्य झाला – सुरु झाला तेंव्हा अर्थातच सरकारला गुळगुळीत रस्ते बांधणे भाग पडले ज्यांचा नंतर आलेल्या मोटर गाड्यांसाठी उपयोग झाला. अमेरिकेतली पहिला खास सायकलीसाठीचा रस्ता हा इ.स. १८९४ ला कोने आयलंड ते ब्रुकलिन प्रोस्पेक्ट पार्क असा बांधला गेला.  सायकलचा फक्त परिवहन नाही तर इतर कामांसाठी उदा. अग्निशमन सेवेसाठी पण होऊ लागला.


सायकलमुळे अनेक सामाजिक सांस्कृतिक परिणाम ही घडले. मादाम सुसन ब्राऊनेल (१८२०-१९०६) अंथोनी ह्या अमेरिकेतली प्रसिद्ध स्त्री हक्क कार्यकर्त्या आणि समाज सुधारक. त्यांच्या मते सायकलने दुसऱ्या कुठल्याही वस्तूपेक्षा अधिक प्रमाणात स्त्रियांचे सशक्तीकरण / सबलीकरण केले आहे. १९ व्या शतकाचा अंत आणि २० व्या शतकाचा पूर्वार्ध हा काळ स्त्री-पुरुष समतेच्या वाढीचा, समाजाचा बदलाचा काळ होता आणि त्याच काळात सायकलमुळे त्याकाळच्या पाश्चिमात्य शहरांतील स्त्रियांनाही एक चालण्या – फिरण्याचे न भूतो असे स्वातंत्र्य मिळाले साधन मिळाले. मुख्य म्हणजे सायकल चालवण्याच्या निमित्ताने व्हिक्टोरियन कपड्यांपासून मुक्ती मिळाली. अर्थातच त्याकाळच्या पाश्चिमात्य शहरांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनीही सायकलचा अवलंब केला.  त्या काळाच्या जवळजवळ सर्व सायकल जाहिरातींमध्ये स्त्रियांनी सायकल चालविण्याचा संदेश होता, ह्या संकल्पनेवर भर होता.  

शहरांमधील वाढलेली वाहतुकीची कोंडी, वाढलेली प्रदूषण आणि व्यक्तिगत शरीर आरोग्य इत्यादि प्रश्नांचा उपाय म्हणून सायकल वापराला पुन्हा महत्त्व आले आहे आणि जगातील जवळजवळ सर्व मोठ्या शहरांमध्ये ते पसरले आहे, झपाट्याने पसरते आहे. सायकल वापरासाठी शहरांचे नियोजन नव्याने केले जाते आहे, रस्ते नव्या प्रकारे आखण्यात – बांधण्यात येत आहेत आणि सायकलचा वापर सहज पणे करता यावा, ती सहजपणे मिळावी, कमी खर्चात मिळावी ह्या साऱ्या साठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येऊ लागला आहे. भविष्यात शहरे, शहरीकरण प्रक्रिया आणि सारे जगच  संपूर्णपणे शाश्वत विकास आधारित होण्यासाठी जो २० ते ३० वर्षाचा काळ लागणार आहे ह्या कालखंडात सायकल अतिशय महत्त्वाची भूमिका भाजविणार आहे, शहरांना नव्याने घडणार आहे हे निश्चित आहे – काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे  ..... 


[1] Sidewalk Talk series “15 Innovations That Shaped the Modern City.” वर आधारित लेख
[2] लेखात वापरलेली माहिती आणि चित्रे विकिपीडिया आणि विकी कॉमन्स वरून घेतलेली आहे.

Monday, May 7, 2018

शहरे, शहरीकरण, शहरी विकास - लेखांक ३ - आजची शहरे घडविणारे वैज्ञानिक शोध / तंत्रज्ञान – वीज आणि वीज आधारित पथदीप व्यवस्था


शहरे, शहरीकरण, शहरी विकास - लेखांक ३ - आजची शहरे घडविणारे वैज्ञानिक शोध / तंत्रज्ञान – वीज आणि वीज आधारित पथदीप व्यवस्था[1][2] ....

आजची शहरे कुठल्या तंत्रज्ञाना मुळे घडली आणि भविष्यात कुठल्या नव्या तंत्रज्ञानापायी त्यांचे स्वरूप बदलेल हे ह्या लेखांतून मांडण्याचा प्रयत्न आहे. कुठलेही तंत्रज्ञान वा वैज्ञानिक शोध शहराला अचानक एका रात्रीत वा काही दिवसात बदलून टाकत नसतो, अनेकदा तर अनेक दशके जातात नवे तंत्रज्ञान खर्या अर्थाने अमलात यायला आणि शहरे बदलायला. उदा. गेल्या लेखात चर्चा केली ते उदवाहनाचे /लिफ्टचे  तंत्रज्ञान अमलात येऊन उंच इमारती बनायला आणि शहरांची रचना बदलू लागायला ५० हून अधिक वर्षाचा काळ जावा लागला. पहिल्या लेखात मांडले त्याप्रमाणे सौर उर्जेचे तंत्रज्ञान येत्या वर्षांमध्ये शहरेच नव्हे तर सारे जग आणि मानवी जीवन बदलून टाकणार आहे पण ह्या तंत्रज्ञानाचा शोध १९५३ मध्ये होऊनही (कॅल्व्हीन फ्युलर, गेराल्ड पिअरसन आणि डॅरील चॅपिन ह्यांनी सिलिकॉन सोलर सेल बनवला आणि सूर्य प्रकाशापासून वीज बनवली – वापरून दाखवली) आताशी कुठे तिचा मोठ्या सार्वत्रिक स्तरावर उपयोग शक्य झाला आहे. शिवाय शहरांची वाढ आणि शहरीकरण ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे, ती भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा अनेक परीबळे एकत्र येऊन घडते त्यामुळे खरे  पाहता नव्या तंत्रज्ञानाचा शहरांवर कसा आणि केंव्हा परिणाम होईल वा भूतकाळात अमुक एका तंत्रज्ञानाचा कसा परिणाम झाला हे सांगणे अवघड आणि धाडसाचे आहे, तरीही अनेकांनी ह्या विषयी विचार केला आहे करत आहेत ते या लेखांमध्ये मांडण्याचा हा प्रयत्न आहे ....

काल – परवाच बातमी आली की भारताच्या सर्व गावांमध्ये वीज पोचली आणि गावामध्ये वीज पोचल्यावर गावकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया, आता त्यांचे आयुष्य कसे बदलून जाईल हे सारे टीव्हीवर निरनिराळ्या वाहिन्यांद्वारे निरनिराळ्या प्रकारे मांडले जाते आहे. ह्या विजेमुळेच एक प्रकारे आजची शहरे शक्य झाली. तसे पहाता वीज नव्हती त्या आधीही छोट्यापासून ते मोठी शहरे होतीच – वाढत होती, बदलत होती आणि लयाला पण जात होती. विजेचा प्रकाश नसला तरी घराघरा मध्ये मनुष्याने प्रकाशाची सोय एका ना दुसऱ्या प्रकारे केलेली होतीच. शहरांमध्ये रस्त्यांसाठी पथदीप व्यवस्था (streetlight system) ही विजेचा शोध लागण्यापूर्वी पण होती.  रस्त्यांवर रात्रीच्या वेळी प्रकाशासाठी पथदीप लावण्याचा पहिला संदर्भ चवथ्या शतकात अन्तिओच ( Antioch) ह्या ग्रीक-रोमन शहराचा मिळतो. नंतरचा संदर्भ मिळतो आठव्या-नवव्या शतकातील कॉर्दोवा (Cordova) ह्या दक्षिण स्पेन मधील मूळ रोमन पण नंतर अरब साम्राज्यातील शहराचा. युरोप मध्ये मध्ययुगीन कालखंडात शहरांमध्ये रात्री मार्ग दाखवायला, एका ठिकाणाहून दुसरीकडे न्यायला दिवा घेतलेले (कंदील घेतलेले) वाटाडे (link boys) असायचे. वाऱ्यापासून ज्योतीचे संरक्षण करू शकतील असे कंदील (lanterns) विकसित झाले आणि पथदीप व्यवस्थेला चालना मिळाली. ई.स. १५२४ च्या सुमारास पॅरिस मध्ये प्रत्येक घरा बाहेर रात्री कंदील लावणे बंधनकारक होते, अर्थात त्याचे पालन फारसे नीट होत नसे. शेवटी १६६९ मध्ये सरकारने पॅरिस च्या सर्व रस्त्यावर कंदील आधारित पथदीप व्यवस्था सुरु केली. कंदील वा तेलाच्या दिव्यांच्या जागी कोळश्यापासून बनवलेल्या गॅस आधारित पथदीप व्यवस्था १८२९ साली पॅरिस मध्ये सुरु झाली आणि मग जगभर पसरली.
अशाप्रमारे वीज येण्याआधी प्रकाशाची व्यवस्था घरांमध्ये आणि शहरांतील रस्त्यांवर होती मग विजेमुळे वेगळे असे काय घडले ? विजेचे तंत्रज्ञान आले आणि शहरे वा शहरीकरण कसे बदलले? ...

१८०२ साली हम्फ्री डॅव्ही (Humphry Davy) ह्या ब्रिटीश शास्त्रज्ञाने वीज प्रकाशाची (विजेची) निर्मिती केली पण त्यापुढे ७० वर्षाहून अधिक काळ आणि अगणित संशोधकांच्या प्रयत्नानंतर १८७९ साली एडिसन ने घरात वापरता येईल असा इंकॅंडेसन्त लाईट बल्ब बनवला आणि त्याचे व्यापारी उत्पादन सुरु केले आणि वीज घराघरात पोचली. त्याच सुमारास १८७६ लॉस अॅन्जेलीस कौन्सिल ने चार आर्क लॅम्प पथदीप (streetlight) म्हणून लावण्यास मंजुरी दिली. १८७८ मध्ये पॅरिस (पहा आकृती १) आणि लंडन मध्ये विजेचे पथदीप लावण्यात आले. शहरांन मध्ये विजेचे पथदीप वापरण्यात अमेरिकेने आघाडी घेतली आणि १८९० साली अमेरिकेत १३०००० आर्क लॅम्प वापरात आले होते. गजानन शर्मा ह्यांनी लिहिलेल्या पुस्तकानुसार आशिया मध्ये आणि भारतामध्ये सर्वप्रथम विजेचे १०० पथदीप ऑगस्ट १९०५ मध्ये बंगळूरू ह्या शहरात लावण्यात आले आणि वर्षभरात त्यांची संख्या ८६१ इतकी वाढविण्यात आली होती. म्हैसूर राज्याचे चीफ इंजिनीअर विल्यम मॅक हटचीन ह्यांनी हे साध्य केले होते.

Figure 1 Demonstration of Yablochkov's arc lamp powered by Zénobe Gramme alternating current dynamos on the Avenue de l'Opera in Paris (1878), the first form of electric street lighting[3]

थोडक्यात २० वे शतक सुरु झाले आणि वीज ही शहरातील व्यापारी, औद्योगिक, सरकारी – खासगी कार्यालये आणि सर्वसामान्यांच्या घरात पोचली; विजेचा उपयोग शहरी सेवेच्या (streetlight – पथदीप व्यवस्था) रुपात होऊ लागला आणि शहरे आणि शहरी जीवन पुढील प्रमाणे आमुलाग्र बदलले ....

वीज आली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणसाला सहजपणे काम करता येण्याचा काळ / वेळ वाढला. प्रकाशाची साधने आधीही होती पण सहजपणे कुठलेही काम करता येईल इतका पुरेसा प्रकाश, माफक खर्चात सामुहिक आणि व्यक्तिगत रित्या देता येईल अशी ती साधने नव्हती. शहरांमध्ये वीज पोचली आणि उशिरा पर्यंत कार्यालये, उद्योग, दुकाने, संस्था आणि घरांमध्ये अर्थार्जनाचे काम करणे शक्य झाले; त्याहून महत्वाचे म्हणजे वीज आधारित पथदीप व्यवस्थेमुळे उशिरा पर्यंत काम करू लागलेल्या लोकांना सुखरूप आणि सुरक्षित पणे कामावर जाणे वा घरी परतणे शक्य झाले. सर्वात महत्वाचे म्हणजे वीज आधारित पथदीप व्यवस्थेमुळे शहरातील आनंद प्रमोदचे रात्रीचे जीवन (night life) शक्य झाले कारण आता सूर्यास्ता नंतरही लोकं सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे येजा करू लागली. हे जे रात्रीचे दळणवळण आणि रंगीत जीवन शक्य झाले त्यामुळे उपहारगृहे आणि सर्व प्रकारच्या मनोरंजन उद्योगाची वाढ झाली.  काम करता येण्याचे तास वाढल्याने शहरांची रोजगार निर्माण करण्याची क्षमता वाढली, शहरात रोजगार वाढले त्यामुळे लोकांचे शहरांकडे स्थलांतर वाढले, शहरांमध्ये जशी जास्त लोकं आली तशी वाढलेल्या लोकांसाठी आणखी लोकांनी शहरांकडे येण्याची गरज निर्माण झाली आणि शहरे सतत वाढत गेली.   ह्या साऱ्याचा एकंदर परिणाम म्हणजे शहरांची संपत्ती निर्माण (economic wealth generation) करण्याची अनेक पटींनी शक्ती वाढली.

विजेच्या क्षेत्रात अजूनही सतत नवी नवी संशोधने चालू आहेत आणि त्यांचाही परिणाम शहरांवर – शहरी जीवनावर होतो आहे. अगदी ताजे असे उदाहरण म्हणजे काही वर्षापूर्वी एल.ई.डी. दिवे (LED Bulbs) आले आणि त्यामुळे विजेचा वापर आणि त्याविषयीचा खर्च कमी करता येणे शक्य झाले. आपण सारे आपल्या घरातील आधीच्या तंत्रज्ञाना वर आधारित दिवे बदलून एल.ई.डी. तंत्रज्ञान आधारित दिव्यांचा अवलंब करू लागलो आहे, गरिबांना आणि सर्वसामान्यांना ते शक्य व्हावे आणि मोठ्या प्रमाणात विजेचा वापर कमी करता यावा म्हणून सरकारने एल.ई.डी दिवे कमी किंमतीत वाटले आहेत. विकसित देशातील शहरे पण ह्या नव्या दिव्यांचा अवलंब खर्च कमी करण्यासाठी करत आहे. भारतात ह्या नव्या तंत्रज्ञानाचा फायदा शहरांमधील पथदीप व्यवस्थेची गुणवत्ता आणि व्याप्ती वाढविण्यासाठी होतो आहे. भारतातील बहुतांशी शहरांमध्ये पथदीप व्यवस्था अतिशय अपुरी आहे ह्याचे एक कारण म्हणजे पथदीप व्यवस्था चालविण्याने येणारे विजेचे बिल. छोट्या शहरांजवळ पुरेसे पैसे नसल्याने शहरामध्ये पथदीप व्यवस्था पुरेशा प्रमाणात लावणे आणि चालविणे शक्य होत नव्हते पण एल.ई.डी दिवे आधारित वा भविष्यातील सौर उर्जा आधारित पथदीप व्यवस्था चालविण्याचा खर्च बराच कमी येणार असल्यामुळे येत्या वर्षांमध्ये भारतातील शहरांमध्ये पथदीप व्यवस्था चांगल्या गुणवत्तेची आणि व्याप्तीची होणार आहे आणि अर्थातच ह्या शहरांचा विकास होणार आहे ......     

मानवी सभ्यतेच्या सुरवातीपासूनच शहरे आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि इतर सर्व प्रकारची संपत्ती निर्माण करणारी केंद्रे होतीच पण विजेच्या उपयोगाने शहरांची ही शक्ती अनेक पटींनी वाढली, त्यांची वाढही गतिमान झाली आणि आज आपण म्हणतो त्याप्रमाणे शहरे देशाच्या, क्षेत्राच्या विकासाची इंजिन झाली ....



[1] Sidewalk Talk series “15 Innovations That Shaped the Modern City.” वर आधारित लेख
[2] लेखात वापरलेली माहिती आणि चित्रे विकिपीडिया आणि विकी कॉमन्स वरून घेतलेली आहे.
[3] By A. Rintel (from partly legible signature in lower left - Emile Alglave; J. Boulard, Thomas O'Conor Sloane, Charles Marshall Lungren (1884) The Electric Light: Its History, Production, and Applications, D. Appleton and company, p. page=26 Retrieved on 9 January 2009., Public Domain, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=5687409

Sunday, May 6, 2018

शहरे, शहरीकरण, शहरी विकास - लेखांक २ - आजची शहरे घडविणारे वैज्ञानिक शोध / तंत्रज्ञान - उदवाहन / लिफ्ट



शहरे, शहरीकरण, शहरी विकास - लेखांक २ - आजची शहरे घडविणारे वैज्ञानिक शोध / तंत्रज्ञान - उदवाहन /लिफ्ट  [1][2]


जगभरामध्ये गेल्या दहा वर्षात प्रचलित झालेली आणि अमलात आणली जाणारी ‘स्मार्ट सिटी’ ही संकल्पना जरी सर्वसामान्यांच्या मनात शहरांविषयी नवी स्वप्ने निर्माण करत असली तरी ह्याच्या अर्थ हा नाही की सध्याची वा भूतकाळातील शहरे ‘स्मार्ट’ नव्हती. शहरांची संकुलता मानवी कल्पकते पुढे आव्हाने, प्रश्न उभे करते आणि त्यासाठीचे उपाय शोधायला भाग पडते त्यामुळे शहरे ही मानवतेच्या कल्पकतेची, विज्ञान आणि तंत्रज्ञान विकासाची प्रेरणा स्त्रोत आणि प्रत्यक्ष अमलाची केंद्रे ठरली आहेत. अशा प्रकारे इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात जसे जसे नवे वैज्ञानिक शोध लागत गेले वा तंत्रज्ञान विकसित होत गेले तस तशी त्या काळातली शहरे आधीच्या तुलनेत “स्मार्ट” होत गेली, ठरली. ह्यात सर्वात पहिले उदाहरण म्हणजे मोहंजो-दारो – हडप्पा सभ्यते मधील नगर रचना आणि जलनिस्सारण पद्धती. ह्या सभ्यतेच्या शहरांमध्ये आखीव – रेखीव उभे-आडवे रस्त्यांचे जाळे होते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जलनिस्सारणाची अत्याधुनिक व्यवस्था. भारतातल्या अगदी आजच्या असंख्य शहरांमध्ये ही मूलभूत गुण वैशिष्ट्ये नाहीत. दुसरी उदाहरणे म्हणजे रोमन शहरांमध्ये असलेली पाण्याची व्यवस्था अथवा एकोणिसाव्या शतकात लंडन शहरात विकसित केलेली भूगर्भ रेल्वे व्यवस्था.

शहरांनी कल्पकतेसाठी, वैज्ञानिक आणि तांत्रिक शोधांसाठी गरज निर्माण केली आणि लागलेल्या शोधांच्या प्रत्यक्ष अमलीकरणासाठी संधी पण पुरवली हे जरी खरे असले तरी गरजेच्या तुलनेत तंत्रज्ञान किती काळात विकसित होईल वा लागलेला शोध, विकसित झालेले तंत्रज्ञान शहरात प्रत्यक्षात केंव्हा वापरले जाईल हे सांगणे मात्र अति अवघड असते कारण ते  राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा अनेक बाबींवर आधारित असते. ह्याहून ही अवघड असते नव्या तंत्रज्ञानाच्या वापराचा प्रत्यक्षात कसा परिणाम होईल ह्याविषयी अंदाज बांधणे. उदाहरण म्हणजे १९ व्या शतकात सायकल च्या शोधाने व्यक्तिगत वाहतुकीच्या क्षेत्रात एक मोठी क्रांती केली आणि खरे पाहता सायकल चा वापर शक्य व्हावा म्हणून रस्त्यांची गुणवत्ता वेगळ्या प्रकारची आणि अधिक चांगली करण्याची गरज उभी झाली आणि त्यानुसार रस्ते सुधारणा झाली पण त्याचा  सर्वात मोठा फायदा मोटार गाडी घेऊन गेली आणि सायकललाच तिने हद्दपार केले.

सध्याच्या शहरीकरणाचा आणि शहरी व्यवस्थेचा अंत होणार की नाही अथवा होणार तर तो कशा प्रकारे होणार हे पाहण्या आधी आजची शहरे घडविणाऱ्या किंवा एका प्रकारे आधीच्या काळातील शहरांचा अंत करणाऱ्या काही कल्पक, तांत्रिक, वैज्ञानिक शोधाची सुरस रम्य कहाणी पाहूया -

विकसित देशातील शहरे म्हणजे उंच उंच इमारतींनी नटलेली शहरे असे चित्र आपल्या नजरेपुढे क्षणात उभे रहाते. आता तर विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये सध्या ग्रामीण विस्तारातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्थलांतरामुळे शहरांच्या अवाच्यासव्वा वाढणाऱ्या आकारमानामुळे निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या प्रश्नाला आणि उपजाऊ शेत जमिनीच्या ह्रासाला आळा घालण्यासाठी आडवी शहरे, उंच करण्याची मोहीम सुरु झाली आहे आणि भारतात तर शहरे उंच भूमिका अधिकृत रित्या मांडण्यात येत आहे आणि अमलात येऊ लागली आहे. मुंबई शहराचा नुकताच जो सुधारित विकास आराखडा बनविण्यात आला आहे त्यात जमिनीचे क्षेत्रफळ आणि इमारतीची उंची ह्याचे गुणोत्तर वाढविण्यात आले आहे. (इतर शहरातही हे गुणोत्तर वाढवून देण्यात येत आहे ज्या योगे उंच इमारती बांधणे शक्य व्हावे, कमी जागेत अधिक लोकसंख्येला समावणे शक्य व्हावे आणि शहरे आटोपशीर व्हावी. शहरे उंच होऊ द्यावी की नाहीत या विषयी वाद आहे पण ज्या प्रमाणात भारतातील शहरांची लोकसंख्या येणाऱ्या वर्षामध्ये वाढणार आहे ती लक्षात घेता शहरे उंच करण्याचे घोरण सध्या तरी अवलंबावे लागणार आहे.

Figure 1Elevator design by the German
engineer Konrad Kyeser (1405)

मुळात विकसित देशातील उंच इमारतींची शहरे शक्य झाली ती उदवाहनाच्या /लिफ्टच्या  (Elevator) शोधामुळे!!! अगदी १९ व्या शतकाच्या उत्तरार्धा पर्यंत सर्वच शहरे खुजी होती, मोटार गाडी आणि इतर वाहतुकीच्या वाहनांमुळे शहरे आडवी वा पसरट झाली पण शहरे उंच होऊ शकली आणि घनदाट होऊ शकली ती उदवाहनाच्या शोधामुळे. इतकेच नव्हे तर उदवाहनाच्या उपयोगामुळे समाजातील उच्चभ्रू आणि श्रीमंत लोकांचे आणि तदनुषंगाने इतरांचे घराविषयीचे उच्च –निचतेचे, सामाजिक प्रतिष्ठेचे निकषच बदलले. भारतात नाही पण पश्चिमी देशात मालक मंडळी तळ मजल्यावर राहत असतं आणि नोकर चाकर वरच्या मजल्यावर!! उद्वाहन आले मालक मंडळी उंचावर राहू लागली आणि आज आता आपल्या इथेही स्वतंत्र बंगले सोडल्यास बहु मजली इमारतीत श्रीमंत उंचात उंच मजल्यांवर रहावयास बघतात आणि जितके आपण वरच्या मजल्यावर रहावयास पाहतो तेवढी आपल्याला अधिक किंमत द्यावी लागते.....

उदवाहनाचा (उंच जाणारी रेल्वे – verticle railway) शोध १८५० च्या सुमारास लागला. १८५३ साली न्यूयॉर्क मध्ये भरलेल्या सर्व देशांच्या औद्योगिक प्रदर्शनात ओटिस उद्योग समूहाचा मूळपुरूष एलिशा ग्रवेस ओटिस याने हव्या त्या ठिकाणी थांबता येईल अशी सुरक्षित पकड असलेल्या उद्वाहनाचे प्रात्यक्षिक दाखवले. यांत्रिक उद्वाहनाचा उपयोग  इतिहासात पार आर्किमिडीज च्या काळापर्यंत मागे जातो, रोमन ग्लडीएटर्स  आणि सिंहांना मैदानामध्ये आणण्यासाठी त्यांचा उपयोग होत असे. रोमन आर्किटेक्ट व्हीतृवियस ने लिहिले आहे त्याप्रमाणे आर्कीमिडीस ने ई.स. २३६ BC मध्ये बहुधा उदवाहनाचा पहिला उपयोग केला.  औद्योगिक क्रांती नंतर वाफेच्या ईंजिन चालणाऱ्या उद्वाहनांचा उपयोग खाणींमध्ये आणि मिल्स मध्ये होऊ लागला होता पण ह्या उदवाहकांना सुरक्षित पकडीची (safety catch) यंत्रणा नसल्याने इतरत्र त्यांचा उपयोग शक्य नव्हता.  

Figure 2 Elisha Otis demonstrating his
safety system, Crystal Palace, 1853

१८७० च्या सुमारास न्यूयॉर्क च्या मॅनहॅटन विस्तारत निर्माण झालेल्या जागेच्या टंचाईने उदवाहनाचा / लिफ्टचा शोध प्रत्यक्ष वापरात आला. खरे पाहता जागेच्या टंचाई मुळे आर्थिक आणि व्यापारी केंद्र दुसरीकडे हलविण्याचा विचार घाटत होता पण ईक्वीटेबल लाईफ अश्युरन्स सोसायटी चा संस्थापक हेन्री हाईड ह्याने वेगळाच विचार केला आणि उदवाहनाच्या उपयोगाने त्याने सात माजली १३० फुट उंच अशी शहरातील सर्वात उंच इमारत बांधली आणि एका नव्या शहरीकरणातील नव्या पर्वाला सुरवात झाली.

१९०० च्या सुमारास वि‍जेवर चालणारी उदवाहने शक्य झाली आणि साऱ्या शहरांची क्षितिज रेषा (sky-line) च बदलून गेली. उदवाहना/लिफ्ट  मुळे उंच इमारती शक्य झाल्या त्यामुळे कमी जागेत अधिक लोकांना सामावणे शक्य झाले, त्यामुळे निरनिराळ्या शहरी सुविधा केंद्रीकृत पद्धतीने आणि माफक खर्चात विकसित करणे शक्य झाले, आणि त्यातून आजची शहरे घडली.

गेल्या काही वर्षात तर शिमला, मसुरी अशा डोंगरातील शहरांच्या वाहतुकीच्या प्रश्नांसाठी उद्वाहनांचा उपयोग करण्यात आला आहे आणि अजूनही मोठ्या प्रमाणात तो करणे गरजेचे आहे.

Figure 3 Elisha Otis's elevator patent
drawing, January 15, 1861

१९५० च्या सुमारास इलेक्ट्रो-मॅग्नेटिक तंत्रज्ञान आधारित स्वयंचलित उदवाहन विकसित झाले, आणि  पुढे त्याची जागा सेन्सर्स आधारित तंत्रज्ञानाने घेतली आहे. आजकालच्या काही उदवाहनांना मशीन रूम ची गरज लागत नाही कारण उदवाहना सोबतच त्याची मोटार फिरू शकते पण खरे पाहता  उद्वाहन / लिफ्ट च्या तंत्रज्ञानात फार मोठे बदल गेल्या १०० वर्षात आलेले  नाहीत म्हणजे उद्वाहना /लिफ्ट साठी अजूनही इमारतीमध्ये एक विशिष्ट प्रकारची विहीर बांधावी लागते आणि लिफ्ट वर-खाली जाण्या-येण्या साठीच वापरली जाते. पण भविष्यात फक्त वर-खाली न जाता आडवा वा वळण घेऊन प्रवास करू शकणारी उद्वाहने शक्य होणार आहेत त्यामुळे उद्वाहानातून बाहेर पडून इमारतीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत जावे लागणार नाही.

उद्वाहनात येऊ घातलेल्या तंत्रज्ञाना मुळे इमारतींचे नवे – अकल्पित आकार शक्य होतील पण त्याने भविष्यातील शहरांची रचना वा शहरीकरणाचे स्वरूप बदलेल असे वाटत नाही, मात्र उद्वाहनांनी  आजच्या शहरांना आणि शहरीकरणाला घडवले हे खरे .......



[1] Sidewalk Talk series “15 Innovations That Shaped the Modern City.”वर आधारित लेख
[2] लेखात वापरलेली तिन्ही चित्रे विकिपीडिया च्या विकी कॉमन्स वरून घेतलेली आहेत.

Saturday, May 5, 2018

शहरे, शहरीकरण, शहरी विकास - लेखांक १ - शहरीकरणाचा अंत ?


लेखांक १ - शहरीकरणाचा अंत ? 


आज कोणी हे विधान केले तर आपण सारे त्याच्याकडे अविश्वासाने पाहू आणि ते खरे आहे कारण निदान २०५० पर्यंत जगामध्ये सातत्याने शहरीकरण वाढत राहणार आहे, शहरे संख्येने आणि आकारानी वाढतच  राहणार आहे हे अनेक संशोधनानी, प्रत्यक्ष आणि अंदाजित आकड्यांनी सिद्ध झालेले आहे. यूनोच्या  अंदाजानुसार २०१५ ला जगाच्या ७.२ अब्ज ह्या एकूण लोकसंख्येच्या ५२ टक्के लोकं (३.७ अब्ज) शहरांमध्ये राहत आहेत. यूनोच्या ह्याच अंदाजानुसार २०५० पर्यंत जगातील शहरीकरण हे २.५ अब्जांनी वाढून त्या वेळेस जगाच्या एकूण ९ अब्ज लोकसंख्येपैकी ६.६ अब्ज लोक शहरांमध्ये राहत असतील म्हणजे शहरीकरण जवळ जवळ ७० टक्के एवढे होईल.

२०१५ ते २०५० ह्या कालखंडात शहरी लोकसंख्या जी २.५ अब्ज ने वाढणार आहे त्यातला जवळ जवळ २० टक्के हिस्सा हा भारतीय शहरीकरणाचा असणार आहे, म्हणजे ह्या कालखंडात भारताची शहरी लोकसंख्या ४० कोटी ने वाढणार आहे. 

एकीकडे अंदाजित आकडे हे भविष्य दाखवत असताना शहरीकरणाचा अंत अथवा अ-शहरीकरण कसे होणार आहे हा प्रश्न मनात सहज येणार. तर त्याचे उत्तर आहे वेगाने विकसित होणारे नव्या धरतीचे तंत्रज्ञान अथवा होऊ घातलेली चौथी औद्योगिक क्रांती (Industry 4.0) !!

औद्योगिक क्रांती आणि तंत्रज्ञान क्रांती मुळेच गेल्या २०० वर्षातील आजच्या स्वरुपाचे शहरीकरण वाढले, आजची शहरे वाढली. उदाहरण म्हणजे १७ व्या शतकातील वाफेच्या इंजिनाचा शोध आणि १८ शतकातील त्याच्या उपयोगाने जहाजांच्या बांधणीत आणि सागरी दळणवळणात झालेल्या क्रांतीमुळेच आजची सारी समुद्रकिनार्‍यावरची बंदर शहरे – मुंबई, कलकत्ता, शांघाई, सिंगापुर, हॉगंकॉगं, न्यूयॉर्क, ह्युस्टन, दुबई, रॉटरडम, हम्बुर्ग इत्यादि अनेक  - जी पूर्वी जगात कधी अस्तित्वात नव्हती, ती अस्तित्वात आली, वाढली. सध्याची शहरे आजच्या स्वरुपात वाढली किंवा अजूनही काही काळ ती वाढतील ह्याचे कारण औद्योगिक क्रांतीने एकाच जागी  खूप प्रमाणात माणसांची आवश्यकता निर्माण केली, एकदा का मोठ्या प्रमाणात माणसे एखाद्या ठिकाणी एकत्र आली, राहू लागली की त्यांना इतर अनेक प्रकारच्या गरजा भागवण्यासाठी आणखी माणसांची गरज पडते त्यामुळे निरनिराळ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात त्यामुळे आणखी माणसे त्या जागी  येतात, राहू लागतात, ह्या साऱ्यांसाठी मग पायाभूत सुविधां विकसविण्याची गरज निर्माण होते म्हणून मग केंद्रीकृत पाणी, विद्युत पुरवठा, जल निस्सारण, रस्ते, घन कचरा व्यवस्थापन, शहरी वाहतूक सेवा, संपर्क (टेलीफोन) साठीचे तंत्रज्ञान विकसित झाले. एकाच जागी लोकं वस्ती करून राहू लागल्याने ह्या साऱ्या सुविधा माफक दरात (economies of scale मुळे) देणे शक्य झाले. ह्या साऱ्या पायी पुन्हा अनेक रोजगार निर्माण झाले आणि आणखी लोकं शहराकडे स्थलांतरित होऊ लागली. लोकांच्या एकमेकांवरील अवलंबनातूनच (interdependence) शहरे निर्माण होतात, वाढतात आणि टिकतात.

गेल्या काही शतकातील तंत्रज्ञान क्रांतीने आजची शहरे आजच्या स्वरुपात ( urban form) वरील प्रक्रियेने वाढली आहेत पण नव्या तंत्रज्ञानापायीच भविष्यात अ-शहरीकरण होणार आहे, शहरांचे विघटन होणार आहे आणि नव्या प्रकारचे शहरीकरण आणि शहरे अस्तित्वात येणार आहेत ते कसे ते पाहूया – 

·         नव्या तंत्रज्ञानामुळे एकाच जागी खूप सर्व माणसांनी एकत्र असण्याची, काम करण्याची आणि त्यासाठी एकाच जागी समीपतेने (in close proximity) एकत्र राहण्याची गरज उरणार नाहीये आणि त्यामुळे अ-शहरीकरणाची (de-urbanisation), शहरांच्या आकुंचनाची, विघटनाची (shrinking and disintegration of cities) प्रक्रिया अस्तित्वात येणार आहे.

·         निरनिराळ्या रोबोट्स च्या उपयोगामुळे प्रत्यक्ष उत्पादनात – (कृषी, औद्योगिक वा इतर) माणसाची आवश्यकताच राहणार नाहीये, किंवा अनेक सोयी – सुविधांसाठी पुरविण्यासाठी पण मनुष्याने प्रत्यक्ष हजर असण्याची वा ती प्रत्यक्ष स्वतः पुरविण्याची गरज राहणार नाहीये. उदा. डॉक्टर्सनी रोग्याला आता प्रत्यक्ष तपासण्याची गरज राहिलेली नाही, वा ऑपरेशन्स पण आता रोबोट्स च्या सहाय्याने अप्रत्यक्ष रित्या होऊ लागली आहेत. चालक रहित वाहने आणि वाहतूक व्यवस्थेमुळे तिथेही माणसांची गरज राहणार नाही. त्याच प्रमाणे शिक्षणही आता ऑनलाईन होऊ लागले आहे, ५ G तंत्रज्ञान येऊ घातले आहे त्यापुढे ६ G पण येईल ह्यामुळे दूर-शिक्षण पण प्रत्यक्षात येईल.

·         इंटरनेट, e-कॉमर्स, e-गव्हर्नन्स, ऑनलाईन शॉपिंग  ह्या साऱ्यामुळे आता बँकांमध्ये, सरकारी कचेरी मध्ये वा खरेदी साठी दुकानांमध्ये जाण्याची गरज कमी झाली आहे भविष्यात ती उरणारच नाही. ह्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर पण होणार आहे.

·         दुसरीकडे ह्या साऱ्या प्रकारच्या संचार क्रांतीमुळे उद्योग धंद्यांना मुद्दाम शहरात आणि त्यातही अगदी मोक्याच्या जागी वा शहराच्या जवळ उद्योग वा धंदे स्थापन करण्याची गरज आता कमी झाली आहे पुढे ती राहणार नाही. अगदी साध्या गावात – छोट्या शहरात उद्योग-धंदा स्थापन करून ही माहिती तंत्रज्ञानामुळे पूर्ण जगभर उत्पादन पाठवणे  शक्य झाले आहे आणि अनेक तसे करू लागले आहेत. जमिनीचे अथवा भू-अर्थशास्त्र (land economics) म्हणतो हा विषयच एक प्रकारे मोडीत निघणार आहे किंवा बदलणार आहे. सध्या ऑनलाईन शॉपिंग आले असले तरी वस्तू घरपोच पोचविण्यासाठी माणसांची गरज पडते आहे, पुढे जाता ड्रोंन वा इतर साधनांद्वारे ह्या साऱ्या वस्तू मनुष्याचा उपयोग न करता घरी पोचवल्या जातील.

·         अनेक संस्थांनी आळी पाळीने आपल्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची योजना अमलात आणली आहे त्याचे पुढे जाता प्रमाण वाढेल आणि एक दिवस ऑफिसलाच जावे लागणार नाही. विडीयो कॉन्फरन्स तंत्रज्ञाना आले आहेच त्याच्या भविष्यातील पूर्णपणे उपयोगामुळे ही लोकांना कामासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याची गरज उरणार नाही. मोबाइल फोन आल्यामुळे पारंपरिक एका जागेशी निगडीत अशा दूरध्वनी व्यवस्थेची आवश्यकता उरलेली नाही.

·         वरील बदला सोबत विकसित होत असलेल्या सौर ऊर्जा तंत्रज्ञान,  हवेपासून पाणी निर्माण करण्याचे तंत्रज्ञान, जल निस्सारण आणि घन कचरा निकालाचे विकेंद्रित तंत्रज्ञान इत्यादि तंत्रज्ञानांमुळे लोकांना कुठेही, कसेही मोकळेपणाने, एकटे राहणे शक्य होणार आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे लोकं तंत्रज्ञानामुळे एका वेगळ्या प्रकारे जगण्यासाठी लागणाऱ्या पाणी, जलनिस्सारण, घन कचरा निकाल, वीज –ऊर्जा, वाहतूक इत्यादि मुलभूत गरजांच्या बाबतीत स्वावलंबी होणार आहेत, त्यांचे सध्याचे ह्या गरजांच्या बाबतीतील इतरांवरील अवलंबित्व जवळजवळ संपणार आहे. शहरांचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे लोकांचे एकमेकांवरील अवलंबित्व आणि तेच जर कमी झाले तर अ-शहरीकरण घडणारच.  

थोडक्यात ह्या आणि इतर अनेक प्रकारच्या तंत्रज्ञान क्रांतीपायी लोकांनी शहरातच राहिले पाहिजे आणि लोकांच्या एका समूहाला अनेकविध सोयी सुविधा पुरविण्यासाठी लोकांच्या दुसऱ्या समूहाची आणि मग त्याच्यासाठी तिसऱ्या लोक समूहाची शहरात येण्याची, काम करण्याची आवश्यकताच उरणार नाहीये आणि ह्यातूनच अ-शहरीकरण आणि शहरांचे आकुंचन होणार आहे. आज जरी शहरीकरण वाढताना दिसत असले, शहरे दिन दुनि रात चौगुणी वाढत असली तरी खरे पाहता अ-शहरीकरणाची आणि शहरांच्या आकुंचनाची प्रक्रिया सुरु झाली आहे.

जापान, चायना, लाटीविया, बोसनिया – हरझेगोवेनिया मधील काही शहरे २००५-२०१५ ह्या कालखंडात ८.५ % ते १५ % नी आकुंचित पावली आहेत. जर्मनी आणि अमेरिकेतली अनेक शहरे आकुंचित पावत आहेत, अर्थात हे मुख्यत्वे उद्योग बंद पडल्यामुळे अथवा दुसरीकडे स्थलांतरित झाल्यामुळे  झाले आहे पण भविष्यात शहरे फक्त उद्योगांचे स्थलांतर झाल्यामुळे नाही तर वर मांडलेल्या निरनिराळ्या तंत्रज्ञान क्रांतीमुळे अगदी सगळ्या प्रकारचे मानवी व्यवहार बदलणार आहेत, त्यामुळे सगळ्या प्रकारचे रोजगार घटणार आहेत, कमी होणार आहेत आणि त्यामुळे शहरे आजच्या स्वरुपात टिकवणे शक्य राहणार नाही. नव्या तंत्रज्ञानामुळे अर्थातच नवे रोजगार निर्माण होणार पण त्यांना आजच्या प्रकारच्या शहरांची गरज असणार नाही थोडक्यात ह्या साऱ्या प्रक्रियेत शहरीकरणाचे स्वरूप बदलणार आहे, शहरांचे स्वरूप ही बदलणार आहे. 

भूतकाळात तंत्रज्ञान क्रांतीने शहरीकरण आणि शहरे घडवली आहेत आणि येणाऱ्या भविष्यात ही येऊ घातलेले तंत्रज्ञान शहरे आणि शहरीकरण नव्याने घडवणार आहे, कारण २०६५ साली जी शहरे अस्तित्वात असणार आहेत त्यातली ६५ % शहरे अजून अस्तित्वातच आलेली नाहीत ! तेंव्हा ही नवी शहरे नव्या रचने प्रमाणे अस्तित्वात येतील अथवा यावी.


शहरीकरणाचा वा शहरांचा अंत होणार नाही पण आजच्या प्रकारच्या शहरीकरणाचा – शहरांचा अंत नक्कीच होणार !! नवी शहरे कशी असतील, नव्या तंत्रज्ञानाचे त्यामुळे होणाऱ्या अ-शहरीकरणाचे सामाजिक, सांस्कृतिक परिणाम काय होतील ह्या विषयी आणि त्याआधी भूतकाळात तंत्रज्ञानामुळे आजचे शहरीकरण कसे शक्य झाले,  शहरे आजच्या स्वरुपात कशी घडली हे पुढल्या लेखांमध्ये पाहूया .......