शहरे, शहरीकरण, शहरी विकास - लेखांक २ - आजची शहरे घडविणारे वैज्ञानिक शोध /
तंत्रज्ञान - उदवाहन /लिफ्ट [1][2]
जगभरामध्ये
गेल्या दहा वर्षात प्रचलित झालेली आणि अमलात आणली जाणारी ‘स्मार्ट सिटी’ ही संकल्पना
जरी सर्वसामान्यांच्या मनात शहरांविषयी नवी स्वप्ने निर्माण करत असली तरी ह्याच्या
अर्थ हा नाही की सध्याची वा भूतकाळातील शहरे ‘स्मार्ट’ नव्हती. शहरांची संकुलता
मानवी कल्पकते पुढे आव्हाने, प्रश्न उभे करते आणि त्यासाठीचे उपाय शोधायला भाग
पडते त्यामुळे शहरे ही मानवतेच्या कल्पकतेची, विज्ञान आणि तंत्रज्ञान विकासाची
प्रेरणा स्त्रोत आणि प्रत्यक्ष अमलाची केंद्रे ठरली आहेत. अशा प्रकारे इतिहासाच्या
प्रत्येक कालखंडात जसे जसे नवे वैज्ञानिक शोध लागत गेले वा तंत्रज्ञान विकसित होत
गेले तस तशी त्या काळातली शहरे आधीच्या तुलनेत “स्मार्ट” होत गेली, ठरली. ह्यात
सर्वात पहिले उदाहरण म्हणजे मोहंजो-दारो – हडप्पा सभ्यते मधील नगर रचना आणि
जलनिस्सारण पद्धती. ह्या सभ्यतेच्या शहरांमध्ये आखीव – रेखीव उभे-आडवे रस्त्यांचे जाळे
होते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जलनिस्सारणाची अत्याधुनिक व्यवस्था. भारतातल्या अगदी
आजच्या असंख्य शहरांमध्ये ही मूलभूत गुण वैशिष्ट्ये नाहीत. दुसरी उदाहरणे म्हणजे
रोमन शहरांमध्ये असलेली पाण्याची व्यवस्था अथवा एकोणिसाव्या शतकात लंडन शहरात विकसित
केलेली भूगर्भ रेल्वे व्यवस्था.
शहरांनी कल्पकतेसाठी,
वैज्ञानिक आणि तांत्रिक शोधांसाठी गरज निर्माण केली आणि लागलेल्या शोधांच्या
प्रत्यक्ष अमलीकरणासाठी संधी पण पुरवली हे जरी खरे असले तरी गरजेच्या तुलनेत
तंत्रज्ञान किती काळात विकसित होईल वा लागलेला शोध, विकसित झालेले तंत्रज्ञान
शहरात प्रत्यक्षात केंव्हा वापरले जाईल हे सांगणे मात्र अति अवघड असते कारण ते राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा अनेक
बाबींवर आधारित असते. ह्याहून ही अवघड असते नव्या तंत्रज्ञानाच्या वापराचा प्रत्यक्षात
कसा परिणाम होईल ह्याविषयी अंदाज बांधणे. उदाहरण म्हणजे १९ व्या शतकात सायकल च्या शोधाने
व्यक्तिगत वाहतुकीच्या क्षेत्रात एक मोठी क्रांती केली आणि खरे पाहता सायकल चा
वापर शक्य व्हावा म्हणून रस्त्यांची गुणवत्ता वेगळ्या प्रकारची आणि अधिक चांगली
करण्याची गरज उभी झाली आणि त्यानुसार रस्ते सुधारणा झाली पण त्याचा सर्वात मोठा फायदा मोटार गाडी घेऊन गेली आणि सायकललाच
तिने हद्दपार केले.
सध्याच्या
शहरीकरणाचा आणि शहरी व्यवस्थेचा अंत होणार की नाही अथवा होणार तर तो कशा प्रकारे
होणार हे पाहण्या आधी आजची शहरे घडविणाऱ्या किंवा एका प्रकारे आधीच्या काळातील
शहरांचा अंत करणाऱ्या काही कल्पक, तांत्रिक, वैज्ञानिक शोधाची सुरस रम्य कहाणी पाहूया
-
विकसित देशातील
शहरे म्हणजे उंच उंच इमारतींनी नटलेली शहरे असे चित्र आपल्या नजरेपुढे क्षणात उभे
रहाते. आता तर विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये सध्या ग्रामीण विस्तारातून मोठ्या प्रमाणात
होणाऱ्या स्थलांतरामुळे शहरांच्या अवाच्यासव्वा वाढणाऱ्या आकारमानामुळे निर्माण
होणाऱ्या वाहतुकीच्या प्रश्नाला आणि उपजाऊ शेत जमिनीच्या ह्रासाला आळा घालण्यासाठी
आडवी शहरे, उंच करण्याची मोहीम सुरु झाली आहे आणि भारतात तर शहरे उंच भूमिका अधिकृत
रित्या मांडण्यात येत आहे आणि अमलात येऊ लागली आहे. मुंबई शहराचा नुकताच जो
सुधारित विकास आराखडा बनविण्यात आला आहे त्यात जमिनीचे क्षेत्रफळ आणि इमारतीची
उंची ह्याचे गुणोत्तर वाढविण्यात आले आहे. (इतर शहरातही हे गुणोत्तर वाढवून
देण्यात येत आहे ज्या योगे उंच इमारती बांधणे शक्य व्हावे, कमी जागेत अधिक लोकसंख्येला
समावणे शक्य व्हावे आणि शहरे आटोपशीर व्हावी. शहरे उंच होऊ द्यावी की नाहीत या
विषयी वाद आहे पण ज्या प्रमाणात भारतातील शहरांची लोकसंख्या येणाऱ्या वर्षामध्ये
वाढणार आहे ती लक्षात घेता शहरे उंच करण्याचे घोरण सध्या तरी अवलंबावे लागणार आहे.
Figure 1Elevator design by the German engineer Konrad Kyeser (1405) |
उदवाहनाचा (उंच जाणारी रेल्वे – verticle railway) शोध १८५०
च्या सुमारास लागला. १८५३ साली न्यूयॉर्क मध्ये भरलेल्या सर्व देशांच्या औद्योगिक
प्रदर्शनात ओटिस उद्योग समूहाचा मूळपुरूष एलिशा ग्रवेस ओटिस याने हव्या त्या
ठिकाणी थांबता येईल अशी सुरक्षित पकड असलेल्या उद्वाहनाचे प्रात्यक्षिक दाखवले.
यांत्रिक उद्वाहनाचा उपयोग इतिहासात पार आर्किमिडीज
च्या काळापर्यंत मागे जातो, रोमन ग्लडीएटर्स
आणि सिंहांना मैदानामध्ये आणण्यासाठी त्यांचा उपयोग होत असे. रोमन आर्किटेक्ट व्हीतृवियस ने लिहिले आहे त्याप्रमाणे आर्कीमिडीस ने ई.स. २३६ BC मध्ये बहुधा उदवाहनाचा पहिला उपयोग केला. औद्योगिक क्रांती
नंतर वाफेच्या ईंजिन चालणाऱ्या उद्वाहनांचा उपयोग खाणींमध्ये आणि मिल्स मध्ये होऊ लागला होता पण ह्या उदवाहकांना
सुरक्षित पकडीची (safety catch) यंत्रणा नसल्याने इतरत्र त्यांचा उपयोग शक्य
नव्हता.
Figure 2 Elisha Otis
demonstrating his safety system, Crystal Palace, 1853 |
१८७० च्या
सुमारास न्यूयॉर्क च्या मॅनहॅटन विस्तारत निर्माण झालेल्या जागेच्या टंचाईने उदवाहनाचा
/ लिफ्टचा शोध प्रत्यक्ष वापरात आला. खरे पाहता जागेच्या टंचाई मुळे आर्थिक आणि
व्यापारी केंद्र दुसरीकडे हलविण्याचा विचार घाटत होता पण ईक्वीटेबल लाईफ अश्युरन्स
सोसायटी चा संस्थापक हेन्री हाईड ह्याने वेगळाच विचार केला आणि उदवाहनाच्या
उपयोगाने त्याने सात माजली १३० फुट उंच अशी शहरातील सर्वात उंच इमारत बांधली आणि एका
नव्या शहरीकरणातील नव्या पर्वाला सुरवात झाली.
१९०० च्या सुमारास विजेवर चालणारी उदवाहने शक्य झाली आणि साऱ्या
शहरांची क्षितिज रेषा (sky-line) च बदलून गेली. उदवाहना/लिफ्ट मुळे उंच इमारती शक्य झाल्या त्यामुळे कमी जागेत
अधिक लोकांना सामावणे शक्य झाले, त्यामुळे निरनिराळ्या शहरी सुविधा केंद्रीकृत
पद्धतीने आणि माफक खर्चात विकसित करणे शक्य झाले, आणि त्यातून आजची शहरे घडली.
गेल्या काही
वर्षात तर शिमला, मसुरी अशा डोंगरातील शहरांच्या वाहतुकीच्या प्रश्नांसाठी उद्वाहनांचा
उपयोग करण्यात आला आहे आणि अजूनही
मोठ्या प्रमाणात तो करणे गरजेचे आहे.
Figure 3 Elisha Otis's
elevator patent drawing, January 15, 1861 |
१९५० च्या सुमारास इलेक्ट्रो-मॅग्नेटिक तंत्रज्ञान आधारित
स्वयंचलित उदवाहन विकसित झाले, आणि पुढे
त्याची जागा सेन्सर्स आधारित तंत्रज्ञानाने घेतली आहे. आजकालच्या काही उदवाहनांना
मशीन रूम ची गरज लागत नाही कारण उदवाहना सोबतच त्याची मोटार फिरू शकते पण खरे
पाहता उद्वाहन / लिफ्ट च्या तंत्रज्ञानात
फार मोठे बदल गेल्या १०० वर्षात आलेले नाहीत
म्हणजे उद्वाहना /लिफ्ट साठी अजूनही इमारतीमध्ये एक विशिष्ट प्रकारची विहीर
बांधावी लागते आणि लिफ्ट वर-खाली जाण्या-येण्या साठीच वापरली जाते. पण भविष्यात
फक्त वर-खाली न जाता आडवा वा वळण घेऊन प्रवास करू शकणारी उद्वाहने शक्य होणार आहेत
त्यामुळे उद्वाहानातून बाहेर पडून इमारतीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत
जावे लागणार नाही.
उद्वाहनात येऊ
घातलेल्या तंत्रज्ञाना मुळे इमारतींचे नवे – अकल्पित आकार शक्य होतील पण त्याने भविष्यातील
शहरांची रचना वा शहरीकरणाचे स्वरूप बदलेल असे वाटत नाही, मात्र उद्वाहनांनी आजच्या शहरांना आणि शहरीकरणाला घडवले हे खरे .......
No comments:
Post a Comment