Saturday, May 5, 2018

शहरे, शहरीकरण, शहरी विकास - लेखांक १ - शहरीकरणाचा अंत ?


लेखांक १ - शहरीकरणाचा अंत ? 


आज कोणी हे विधान केले तर आपण सारे त्याच्याकडे अविश्वासाने पाहू आणि ते खरे आहे कारण निदान २०५० पर्यंत जगामध्ये सातत्याने शहरीकरण वाढत राहणार आहे, शहरे संख्येने आणि आकारानी वाढतच  राहणार आहे हे अनेक संशोधनानी, प्रत्यक्ष आणि अंदाजित आकड्यांनी सिद्ध झालेले आहे. यूनोच्या  अंदाजानुसार २०१५ ला जगाच्या ७.२ अब्ज ह्या एकूण लोकसंख्येच्या ५२ टक्के लोकं (३.७ अब्ज) शहरांमध्ये राहत आहेत. यूनोच्या ह्याच अंदाजानुसार २०५० पर्यंत जगातील शहरीकरण हे २.५ अब्जांनी वाढून त्या वेळेस जगाच्या एकूण ९ अब्ज लोकसंख्येपैकी ६.६ अब्ज लोक शहरांमध्ये राहत असतील म्हणजे शहरीकरण जवळ जवळ ७० टक्के एवढे होईल.

२०१५ ते २०५० ह्या कालखंडात शहरी लोकसंख्या जी २.५ अब्ज ने वाढणार आहे त्यातला जवळ जवळ २० टक्के हिस्सा हा भारतीय शहरीकरणाचा असणार आहे, म्हणजे ह्या कालखंडात भारताची शहरी लोकसंख्या ४० कोटी ने वाढणार आहे. 

एकीकडे अंदाजित आकडे हे भविष्य दाखवत असताना शहरीकरणाचा अंत अथवा अ-शहरीकरण कसे होणार आहे हा प्रश्न मनात सहज येणार. तर त्याचे उत्तर आहे वेगाने विकसित होणारे नव्या धरतीचे तंत्रज्ञान अथवा होऊ घातलेली चौथी औद्योगिक क्रांती (Industry 4.0) !!

औद्योगिक क्रांती आणि तंत्रज्ञान क्रांती मुळेच गेल्या २०० वर्षातील आजच्या स्वरुपाचे शहरीकरण वाढले, आजची शहरे वाढली. उदाहरण म्हणजे १७ व्या शतकातील वाफेच्या इंजिनाचा शोध आणि १८ शतकातील त्याच्या उपयोगाने जहाजांच्या बांधणीत आणि सागरी दळणवळणात झालेल्या क्रांतीमुळेच आजची सारी समुद्रकिनार्‍यावरची बंदर शहरे – मुंबई, कलकत्ता, शांघाई, सिंगापुर, हॉगंकॉगं, न्यूयॉर्क, ह्युस्टन, दुबई, रॉटरडम, हम्बुर्ग इत्यादि अनेक  - जी पूर्वी जगात कधी अस्तित्वात नव्हती, ती अस्तित्वात आली, वाढली. सध्याची शहरे आजच्या स्वरुपात वाढली किंवा अजूनही काही काळ ती वाढतील ह्याचे कारण औद्योगिक क्रांतीने एकाच जागी  खूप प्रमाणात माणसांची आवश्यकता निर्माण केली, एकदा का मोठ्या प्रमाणात माणसे एखाद्या ठिकाणी एकत्र आली, राहू लागली की त्यांना इतर अनेक प्रकारच्या गरजा भागवण्यासाठी आणखी माणसांची गरज पडते त्यामुळे निरनिराळ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात त्यामुळे आणखी माणसे त्या जागी  येतात, राहू लागतात, ह्या साऱ्यांसाठी मग पायाभूत सुविधां विकसविण्याची गरज निर्माण होते म्हणून मग केंद्रीकृत पाणी, विद्युत पुरवठा, जल निस्सारण, रस्ते, घन कचरा व्यवस्थापन, शहरी वाहतूक सेवा, संपर्क (टेलीफोन) साठीचे तंत्रज्ञान विकसित झाले. एकाच जागी लोकं वस्ती करून राहू लागल्याने ह्या साऱ्या सुविधा माफक दरात (economies of scale मुळे) देणे शक्य झाले. ह्या साऱ्या पायी पुन्हा अनेक रोजगार निर्माण झाले आणि आणखी लोकं शहराकडे स्थलांतरित होऊ लागली. लोकांच्या एकमेकांवरील अवलंबनातूनच (interdependence) शहरे निर्माण होतात, वाढतात आणि टिकतात.

गेल्या काही शतकातील तंत्रज्ञान क्रांतीने आजची शहरे आजच्या स्वरुपात ( urban form) वरील प्रक्रियेने वाढली आहेत पण नव्या तंत्रज्ञानापायीच भविष्यात अ-शहरीकरण होणार आहे, शहरांचे विघटन होणार आहे आणि नव्या प्रकारचे शहरीकरण आणि शहरे अस्तित्वात येणार आहेत ते कसे ते पाहूया – 

·         नव्या तंत्रज्ञानामुळे एकाच जागी खूप सर्व माणसांनी एकत्र असण्याची, काम करण्याची आणि त्यासाठी एकाच जागी समीपतेने (in close proximity) एकत्र राहण्याची गरज उरणार नाहीये आणि त्यामुळे अ-शहरीकरणाची (de-urbanisation), शहरांच्या आकुंचनाची, विघटनाची (shrinking and disintegration of cities) प्रक्रिया अस्तित्वात येणार आहे.

·         निरनिराळ्या रोबोट्स च्या उपयोगामुळे प्रत्यक्ष उत्पादनात – (कृषी, औद्योगिक वा इतर) माणसाची आवश्यकताच राहणार नाहीये, किंवा अनेक सोयी – सुविधांसाठी पुरविण्यासाठी पण मनुष्याने प्रत्यक्ष हजर असण्याची वा ती प्रत्यक्ष स्वतः पुरविण्याची गरज राहणार नाहीये. उदा. डॉक्टर्सनी रोग्याला आता प्रत्यक्ष तपासण्याची गरज राहिलेली नाही, वा ऑपरेशन्स पण आता रोबोट्स च्या सहाय्याने अप्रत्यक्ष रित्या होऊ लागली आहेत. चालक रहित वाहने आणि वाहतूक व्यवस्थेमुळे तिथेही माणसांची गरज राहणार नाही. त्याच प्रमाणे शिक्षणही आता ऑनलाईन होऊ लागले आहे, G तंत्रज्ञान येऊ घातले आहे त्यापुढे ६ G पण येईल ह्यामुळे दूर-शिक्षण पण प्रत्यक्षात येईल.

·         इंटरनेट, e-कॉमर्स, e-गव्हर्नन्स, ऑनलाईन शॉपिंग  ह्या साऱ्यामुळे आता बँकांमध्ये, सरकारी कचेरी मध्ये वा खरेदी साठी दुकानांमध्ये जाण्याची गरज कमी झाली आहे भविष्यात ती उरणारच नाही. ह्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर पण होणार आहे.

·         दुसरीकडे ह्या साऱ्या प्रकारच्या संचार क्रांतीमुळे उद्योग धंद्यांना मुद्दाम शहरात आणि त्यातही अगदी मोक्याच्या जागी वा शहराच्या जवळ उद्योग वा धंदे स्थापन करण्याची गरज आता कमी झाली आहे पुढे ती राहणार नाही. अगदी साध्या गावात – छोट्या शहरात उद्योग-धंदा स्थापन करून ही माहिती तंत्रज्ञानामुळे पूर्ण जगभर उत्पादन पाठवणे  शक्य झाले आहे आणि अनेक तसे करू लागले आहेत. जमिनीचे अथवा भू-अर्थशास्त्र (land economics) म्हणतो हा विषयच एक प्रकारे मोडीत निघणार आहे किंवा बदलणार आहे. सध्या ऑनलाईन शॉपिंग आले असले तरी वस्तू घरपोच पोचविण्यासाठी माणसांची गरज पडते आहे, पुढे जाता ड्रोंन वा इतर साधनांद्वारे ह्या साऱ्या वस्तू मनुष्याचा उपयोग न करता घरी पोचवल्या जातील.

·         अनेक संस्थांनी आळी पाळीने आपल्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची योजना अमलात आणली आहे त्याचे पुढे जाता प्रमाण वाढेल आणि एक दिवस ऑफिसलाच जावे लागणार नाही. विडीयो कॉन्फरन्स तंत्रज्ञाना आले आहेच त्याच्या भविष्यातील पूर्णपणे उपयोगामुळे ही लोकांना कामासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याची गरज उरणार नाही. मोबाइल फोन आल्यामुळे पारंपरिक एका जागेशी निगडीत अशा दूरध्वनी व्यवस्थेची आवश्यकता उरलेली नाही.

·         वरील बदला सोबत विकसित होत असलेल्या सौर ऊर्जा तंत्रज्ञान,  हवेपासून पाणी निर्माण करण्याचे तंत्रज्ञान, जल निस्सारण आणि घन कचरा निकालाचे विकेंद्रित तंत्रज्ञान इत्यादि तंत्रज्ञानांमुळे लोकांना कुठेही, कसेही मोकळेपणाने, एकटे राहणे शक्य होणार आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे लोकं तंत्रज्ञानामुळे एका वेगळ्या प्रकारे जगण्यासाठी लागणाऱ्या पाणी, जलनिस्सारण, घन कचरा निकाल, वीज –ऊर्जा, वाहतूक इत्यादि मुलभूत गरजांच्या बाबतीत स्वावलंबी होणार आहेत, त्यांचे सध्याचे ह्या गरजांच्या बाबतीतील इतरांवरील अवलंबित्व जवळजवळ संपणार आहे. शहरांचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे लोकांचे एकमेकांवरील अवलंबित्व आणि तेच जर कमी झाले तर अ-शहरीकरण घडणारच.  

थोडक्यात ह्या आणि इतर अनेक प्रकारच्या तंत्रज्ञान क्रांतीपायी लोकांनी शहरातच राहिले पाहिजे आणि लोकांच्या एका समूहाला अनेकविध सोयी सुविधा पुरविण्यासाठी लोकांच्या दुसऱ्या समूहाची आणि मग त्याच्यासाठी तिसऱ्या लोक समूहाची शहरात येण्याची, काम करण्याची आवश्यकताच उरणार नाहीये आणि ह्यातूनच अ-शहरीकरण आणि शहरांचे आकुंचन होणार आहे. आज जरी शहरीकरण वाढताना दिसत असले, शहरे दिन दुनि रात चौगुणी वाढत असली तरी खरे पाहता अ-शहरीकरणाची आणि शहरांच्या आकुंचनाची प्रक्रिया सुरु झाली आहे.

जापान, चायना, लाटीविया, बोसनिया – हरझेगोवेनिया मधील काही शहरे २००५-२०१५ ह्या कालखंडात ८.५ % ते १५ % नी आकुंचित पावली आहेत. जर्मनी आणि अमेरिकेतली अनेक शहरे आकुंचित पावत आहेत, अर्थात हे मुख्यत्वे उद्योग बंद पडल्यामुळे अथवा दुसरीकडे स्थलांतरित झाल्यामुळे  झाले आहे पण भविष्यात शहरे फक्त उद्योगांचे स्थलांतर झाल्यामुळे नाही तर वर मांडलेल्या निरनिराळ्या तंत्रज्ञान क्रांतीमुळे अगदी सगळ्या प्रकारचे मानवी व्यवहार बदलणार आहेत, त्यामुळे सगळ्या प्रकारचे रोजगार घटणार आहेत, कमी होणार आहेत आणि त्यामुळे शहरे आजच्या स्वरुपात टिकवणे शक्य राहणार नाही. नव्या तंत्रज्ञानामुळे अर्थातच नवे रोजगार निर्माण होणार पण त्यांना आजच्या प्रकारच्या शहरांची गरज असणार नाही थोडक्यात ह्या साऱ्या प्रक्रियेत शहरीकरणाचे स्वरूप बदलणार आहे, शहरांचे स्वरूप ही बदलणार आहे. 

भूतकाळात तंत्रज्ञान क्रांतीने शहरीकरण आणि शहरे घडवली आहेत आणि येणाऱ्या भविष्यात ही येऊ घातलेले तंत्रज्ञान शहरे आणि शहरीकरण नव्याने घडवणार आहे, कारण २०६५ साली जी शहरे अस्तित्वात असणार आहेत त्यातली ६५ % शहरे अजून अस्तित्वातच आलेली नाहीत ! तेंव्हा ही नवी शहरे नव्या रचने प्रमाणे अस्तित्वात येतील अथवा यावी.


शहरीकरणाचा वा शहरांचा अंत होणार नाही पण आजच्या प्रकारच्या शहरीकरणाचा – शहरांचा अंत नक्कीच होणार !! नवी शहरे कशी असतील, नव्या तंत्रज्ञानाचे त्यामुळे होणाऱ्या अ-शहरीकरणाचे सामाजिक, सांस्कृतिक परिणाम काय होतील ह्या विषयी आणि त्याआधी भूतकाळात तंत्रज्ञानामुळे आजचे शहरीकरण कसे शक्य झाले,  शहरे आजच्या स्वरुपात कशी घडली हे पुढल्या लेखांमध्ये पाहूया .......

3 comments:

  1. लेख खूप चांगला लिहिला आहे सर...पण शहरीकरण हे वाढतच राहणार आहे असे दुसरे लेख वारंवार सांगत असतात. तुम्ही दिलेली दुसरे मुद्दे इ-कॉमर्स अनुरूप रोजगार आणि दळण वळण साधनाबाबत आणि अत्याधुनिक पद्धती मुळे परिवर्तन अगदी निश्चित आहे

    ReplyDelete
    Replies
    1. लेख वाचून अगत्याने अभिप्राय लिहिला त्याबद्दल धन्यवाद.

      Delete
  2. A well mooted idea. Thought provoking.

    ReplyDelete