Saturday, October 15, 2016

शाश्वत शहरे, शाश्वत विकास म्हणजे काय?

दिनांक - १५/१०/२०१६ 

शाश्वत शहरे, शाश्वत विकास म्हणजे काय?

शाश्वत शहर सर्वांसाठी हे ध्येय साध्य होण्यासाठी साऱ्यांना शाश्वत शहर म्हणजे काय? त्याची व्याख्या काय? त्याचे गुणधर्म कोणते, घटक कोणते? ते कसे साध्य करता येईल? शाश्वत शहर घडण्यासाठी एक व्यक्ति म्हणून मी काय करायला हवे? हे ध्येय साध्य करण्यासाठी जगभर आणि भारतात, आपण राहतो त्या राज्यात, त्या शहरात काय प्रयत्न केले जात आहेत वा कुठल्या बाबी, निर्णय, घडामोडी आपणाला शाश्वत शहर आणि विकास ह्या ध्येयापासून दूर नेत आहेत ह्या आणि अशा साऱ्या प्रश्नांविषयी चर्चा घडावयास हवी लोक शिक्षण व्हायला हवे आणि इतर भाषांमध्ये ते होईलच पण ते मराठी भाषेत व्हायला हवे आणि महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण विकास हा शाश्वत मार्गाने व्हायला हवा म्हणून हा ब्लॉग आणि त्याला संलग्न फेसबुक गट आणि संकेतस्थळ.....

शाश्वत शहर या संकल्पनेची एकच एका अशी व्याख्या नाही – हरित शहर वा पर्यावरण वादी शहर ते शाश्वत शहर असा तिचा प्रवास आहे आणि काळासोबत ती विस्तृत होते  आहे. या संकल्पनेच्या  सध्याच्या व्यापक व्याख्येनुसार पर्यावरण, अर्थकारण, राजकारण आणि संस्कृती ह्या शहरी जीवनाच्या चारही अंगांचा सातत्यपूर्ण शाश्वत विकास साधण्याचा प्रयत्न शाश्वत  शहर करते.
  
एक निश्चित व्याख्या नसली तरी साऱ्या तज्ञांचे एका बाबतीत एकमत आहे ती म्हणजे शाश्वत शहराने त्याच्या आजच्या गरजा भविष्यातील पिढ्यांची त्यांच्या गरजा भागवण्याची क्षमता कमी करून वा तिचा बळी देऊन भागवू नयेत. शाश्वत शहर आणि शाश्वत विकास ह्या संकल्पनेच्या व्याख्येची सापेक्षता, मुग्धता, अनेक अर्थांची शक्यताच तिची सुंदरता आहे, बळ आहे. या संकल्पनेचा मूळ गाभा, तत्व, अर्थ केंद्रस्थानी ठेवून शहरे आणि आपण सारे कल्पकपणे शाश्वतते कडे वाटचाल करू शकतो....

ह्या विषयावर पुढे जाण्यासाठी शाश्वत शहर या संकल्पनेची एक व्याख्या घेऊया. शाश्वत शहर म्हणजे असे शहर ज्याचे सारे घटक – रहवासी, प्रशासन, सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक संस्था -  ऊर्जा, पाणी, अन्न, द्रव आणि इतर सर्व प्रकारच्या नैसर्गिक साधनांचा कमीत कमी उपयोग / अपव्यय करण्यास प्रतिबद्ध असतात; त्याच प्रमाणे कमीत कमी द्रव आणि घन कचरा निर्माण करण्यास, कमीत कमी वायू (कार्बन आणि मिथेन)  आणि जल प्रदूषण करण्यासही प्रतिबद्ध असतात. शाश्वत शहर (सस्टेनेबल सिटी) ला ecocity पण म्हटले जाते कारण पर्यावरणाला कमीत कमी नुकसान अशा शहरामुळे होते.

ecocity हा शब्द सर्वात प्रथम रिचर्ड रेजीस्टर यांनी १९८७ साली त्यांच्या Ecocity Berkeley: Building Cities for a Healthy Future ह्या पुस्तकात वापरला. शाश्वत शहर ही संकल्पना मांडणाऱ्या इतर व्यक्ति म्हणजे वास्तुशास्त्रज्ञ पौल एफ डाऊनटन आणि लेखक टिमोथी बिटले आणि स्टेफन लेहमन. त्यानंतर अर्थातच सारे जग ह्या संकल्पनेला एक या दुसऱ्या प्रकारे विकसित करीत आहे.

शाश्वत शहरे आणि शाश्वत विकास साधणे अत्यंत आवश्यक झाले आहे कारण सध्या जगाची ५० टक्याहून अधिक लोकसंख्या ही शहरांमध्ये रहाते. २०५० साली जगातील शहरी लोकसंख्या सध्याच्या तुलनेत दुप्पट होणार आहे म्हणजे त्यावेळी जवळजवळ ७० टक्के लोकसंख्या ही शहरांमध्ये राहू लागलेली असेल.  जगाच्या पर्यावरणात जे हानिकारक बदल (climat changes) घडून येऊ लागले आहेत त्यांना आळा घालावयाचा असेल, त्यांना थांबवायचे असेल तर शहरी विकास आणि शहरे ही शाश्वत व्हायलाच हवीत आणि त्यासाठी आज आपण स्वतः, वा प्रशासन, वा आपण निवडून दिलेले प्रतिनिधी, निरनिराळी सरकारे, शहरांच्या विकासा साठी – निभावणी साठी जे निर्णय घेतात, निरनिराळ्या प्रक्रिया अवलंबतात, प्रकल्प आणि इतर कामे राबवतात  त्या साऱ्यांची शाश्वत विकासाच्या निकषांवर कसून तपासणी व्हायला हवी आणि त्यानुसार अमलीकरण व्हायला हवे. 

No comments:

Post a Comment