शाश्वत शहरे सर्वांसाठी
शाश्वत शहरी विकास ह्या ध्येयासाठी
युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन (युनो ) गेली ४० वर्षाहून अधिक कार्य करत आहे. ह्या
साठी युनो दर २० वर्षांनी जागतिक परिषद आयोजित करते त्यात शाश्वत शहरी विकास आणि
घरे ह्या विषयक देश राष्ट्रीय अहवाल आणि पुढल्या २० वर्षासाठीचा राष्ट्रीय अजेंडा,
रणनीती सादर करतो आणि ह्या परिषदेत शाश्वत शहरी विकासाचा पुढील
२० वर्षासाठीचा जागतिक अजेंडा ठरवला जातो. भारताने पण होऊ घातलेल्या
ह्या जागतिक परिषदेसाठी राष्ट्रीय अहवाल तयार केला
आहे. हा अहवाल ०३ ऑक्टोबर २०१६ रोजी शहरी विकास मंत्री यांनी जाहीर केला पण अजूनही
तो साऱ्यांना मिळावा या साठी माहिती महाजालात (वेबसाईट वर ) ठेवण्यात आलेला नाही.
पहिली जागतिक परिषद १९७६ साली हॅबिटाट
- १ या नावाने भरविण्यात आली होती. त्यानंतर दुसरी १९९६ साली आणि आता तिसरी जागतिक
परिषद हॅबिटाट - ३ या नावाने क्विटो – इक्वेडोर ( Quito, Ecuador) येथे १७ ते २०
ऑक्टोबर, २०१६ ला होऊ घातली आहे.
या जागतिक परिषदेला आणखी महत्त्व आले
आहे कारण शाश्वत शहरी विकासाच्या संकल्पने विषयी जरी १९७६ पासून विचार होत असला
तरी सर्वच बाबतीत शाश्वत विकासाचा विचार एकसंध पणे होत नव्हता. पण दीर्घ चर्चे
नंतर जगातील साऱ्या देशांनी नुकतीच शाश्वत विकास ध्येये (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स - एस.डी.जी. ) मान्य केली आहेत आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर ही परिषद होत आहे.
शाश्वत विकास ध्येये (एस.डी.जी. )
हा भविष्यकालीन आंतरराष्ट्रीय
विकास संबंधित ध्येयांचा संच आहे. ही ध्येये युनायटेड नेशन्सने बनविली असून त्यांना साऱ्या देशांनी मान्यता दिली आहे.
या ध्येयांनी मिलेनियम विकास ध्येये ज्यांची मुदत वर्ष 2015
च्या शेवटी संपली , त्यांची जागा घेतली आहे. वर्ष 2015
पासून 2030 पर्यंत ही ध्येये लागू
ठरतील. एकूण १७ ध्येये असून या ध्येयांसाठी 169
विशिष्ट ध्येये आहेत. यातले ११ वे ध्येय शाश्वत
शहरे हे आहे.
शाश्वत विकास ध्येये आणि शाश्वत शहरी
विकासाविषयी संपूर्ण देशात सर्व स्तरावर चर्चा होणे, तदनुसार
विकास कामांचे आयोजन आणि अमलीकरण होणे अतिशय आवश्यक
आहे पण तसे ते होताना दिसत नाही. भारतातील आणि इतर अनेक अविकसित आणि विकसनशील
देशातील शहरे ‘कृष्णविवरे’ बनली आहेत नैसर्गिक आणि साऱ्या प्रकारची संसाधने
शोषून घेणारी बदल्यात काही न देणारी अथवा सर्व प्रकारचे प्रदूषण, सर्व प्रकारचे पश्न उभे करणारी, समस्या निर्माण
करणारी !!
शाश्वत शहरी विकासाची चर्चा,
त्या साठीचे आयोजन होण्या ऐवजी सध्या तरी आपल्या येथे गेल्या
दोन वर्षात फारसे काही न होता ‘स्मार्ट सिटी’ योजनेची चर्चा आहे; शहरांना स्मार्ट करण्याची स्पर्धा सुरु आहे, पण खरी
गरज आहे भारतीय शहरांनी शाश्वत विकास साध्य करण्याची.
स्मार्ट सिटीचे ध्येय शाश्वत विकास हे
असू शकते, असावयास हवे, स्मार्ट
सिटी ही सस्टेनेबल सिटी (शाश्वत शहर) असू शकते पण प्रत्यक्षात तसे ते असेलच,
घडेलच असे नाही. स्मार्ट सिटी सस्टेनेबल असेलच असे नाही. आधीच्या
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीनीकरण योजनेत आर्थिक
शाश्वततेचा पुरेसा विचार न झाल्याने या योजनेच्या अंती वा परिणामी अनेक शहरांची
आर्थिक परिस्थिती बिघडली.
भारतीय स्मार्ट सिटी योजना शाश्वत शहरी
विकास साध्य करू पाहणारी आहे का, शहरांनी जे स्मार्ट
सिटी आराखडे बनवले ते शाश्वत शहरी विकासाचे लक्ष्य सध्या करू पाहणारे आहेत का?
शाश्वत विकास म्हणजे काय? शाश्वत शहरी विकास
म्हणजे काय? शाश्वत शहरी विकास साध्य करण्यासाठी भारतात आपण
साऱ्यांनी काय करावयास हवे? ह्या आणि अशा अनेक पूरक
प्रश्नाची चर्चा होणे गरजेचे आहे, ती जास्तीत जास्त लोकां
पर्यंत पोचावास हवी आणि शक्य झाले तर तिने साऱ्यांना योग्य कृती करण्यास प्रवृत्त
करावयास हवे ह्या उद्देशाने ब्लॉग हा सुरु केला आहे, ह्याच
नावाने फेसबुक पेज निर्माण केले आहे. आपण ह्यात सहभागी होऊन ‘ शाश्वत शहरे आणि
शाश्वत विकास सर्वांसाठी’ ही चळवळ पुढे न्याल ही आशा .............
शाश्वत शहरी विकास ह्या विषयावर
इंग्रजी भाषेत लिहिले जाते आहे पण मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये एकूणच
शहरीकरण, शहरे, शहरी विकास
इत्यादि विषयांवर फारच कमी लिहिले जाते म्हणून हा मराठीतून प्रयत्न, अर्थात काही माहिती ही इंग्रजी भाषेतून पण प्रसारित करावी लागेल.....
No comments:
Post a Comment