Thursday, May 17, 2018

शहरे, शहरीकरण, शहरी विकास - लेखांक ४ - आजची शहरे घडविणारे वैज्ञानिक शोध / तंत्रज्ञान – सायकल – दुचाकी


शहरे, शहरीकरण, शहरी विकास - लेखांक ४ - आजची शहरे घडविणारे वैज्ञानिक शोध / तंत्रज्ञान – सायकल – दुचाकी[1] [2]

आजच्या शहरांची आणि शहरीकरणाची जडण घडण (मुख्यत्वे १९ व्या आणि २० व्या शतकात) सायकल  मुळे शक्य झाली असे म्हटले तर अनेकांना आश्चर्य वाटेल, अनेकांचा विश्वास बसणार नाही पण ज्यांनी सायकलचा उपयोग दिवसरात्र वाहतुकीचे साधन म्हणून केला आहे अथवा आजही करीत आहेत (जगात आजही दोन अब्ज सायकली वापरात आहेत)  आणि शहरात वाढणाऱ्या वाहतूक समस्येचा, प्रदूषणाचा उपाय म्हणून जे सायकल वापराकडे वळत आहेत, “अधिकाधिक सायकल वापरा” - असे सर्वांना सांगत आहेत त्या सर्वांना हा लेख पटणार आहे.  

शहरातील वाहतुकीची आणि प्रदूषणाची समस्या कमी करण्यासाठी जगभर लोकांनी सायकल अधिकाधिक वापरावी ह्या साठीची मोहीम गेल्या काही वर्षापासून सुरु झाली आहे. काही देशांचे पंतप्रधान, मंत्री, उच्च सरकारी अधिकारी, सामाजिक आणि इतर प्रसिद्ध व्यक्ती स्वतः सायकल नेमाने चालवून सायकल वापराला प्रोत्साहन देत आहेत. मधल्या काळात मोटर गाड्यांसाठी शहरातील रस्त्यांची संरचना (design) अशी काही बदलण्यात आली की सायकल वापरणेच अशक्य होऊन बसले आहे आणि त्यामुळे सायकलचे चे वाहतुकीचे साधन म्हणून उच्चाटनच झाले. मात्र “सायकल वापरा” ही जी नवी चळवळ सुरु झाली आहे जगभर, त्यामुळे रस्त्यांची संरचना / डिझाईन पुन्हा बदलून त्यांत सायकल चालवण्यासाठी आरक्षित, स्वतंत्र मार्गाची व्यवस्था करण्यात येत आहे. २०१६ केलेल्या लोकमत चाचणी मध्ये अमेरिकेतली ७० टक्के महापौरांनी सायकलींसाठी स्वतंत्र रस्ते बांधण्याचा मनोदय व्यक्त केला.

भारत सरकारने २०१५ साली १०० शहरांत स्मार्ट सिटी योजना सुरु केली आहे त्यामध्ये शहरामध्ये लोकांना वाहतुकीसाठी सायकलचा वापर करता यावा, तो  वाढावा ह्या साठी रस्त्यांची डिझाईन बदलण्याचे/  करण्याचे प्रकल्प घेण्याच्या आणि सायकल शेअरिंग (Bike Sharing) ची व्यवस्था सुरु करण्याच्या  सूचना देण्यात आल्या आहेत आणि म्हणून आज भारतातील शहरांमध्ये रस्त्यांची रचना बदलण्याचे आणि लोकांना सहजपणे सायकल भाड्याने घेता यावी ह्यासाठी सायकल शेअरिंग चे कार्यक्रम सुरु झाले आहेत. खाजगी क्षेत्राच्या सहयोगाने सायकल शेअरिंग व्यवस्था सुरु करण्यात पुणे, नाशिक, साल्ट लेक सिटी, भोपाळ इत्यादि शहरे आघाडीवर आहेत. ओला, उबेर सारख्या भाड्याने सायकल पुरविणाऱ्या ऑनलाईन कंपन्या आणि त्यासाठीची मोबाईल अॅप्लीकेशन्स पण निर्माण झाली आहेत.

Figure 1 - Wooden draisine (around 1820), the first 
two-wheeler and as such the archetype of the bicycle 
By Gun Powder Ma - Own work, CC BY-SA 3.0, https:// 
commons.wikimedia.org/w/index.php?curid=4406665
खरे पाहता एके काळी सायकल घेण्याची ऐपत नसणाऱ्यांना अथवा फार कमी वेळा साठी तिची गरज असणाऱ्याना, सायकल शिकणाऱ्या छोट्या-मोठ्या मुलांना भाड्याने सायकल देण्याचा धंदा ज्याला आज सायकल अथवा बाईक शेअरिंग असे नवे दिले मिळाले आहे सर्व शहरांत मोठ्या प्रमाणात चालत होता आजही काही प्रमाणात काही ठिकाणी चालतो तर मग ह्या नव्या सायकल शेअरिंग व्यवस्थेत नवे काय आहे? नवे एवढेच आहे की आधीच्या पद्धतीत सायकल ही ओळखीच्या दुकानदाराकडून मिळत असे आणि ज्याच्याकडून भाड्याने घेतली त्याला ती त्याच्या जागी परत आणून द्यावी लागत असे.  नव्या व्यवस्थेत ती शहरांत जागोजागी उभ्या केलेल्या सायकल स्थानकावरून घेता येते आणि आपले काम झाले की शहरातील कुठल्याही स्थानकावर सोडता येते आणि हे सारे आपल्या हातातील स्मार्ट फोन ने करता येते!! म्हणजे सायकल वर अंकित QR कोड स्मार्ट फोन मध्ये दाखल करून घेता सायकल चे कुलूप उघडते आणि तुम्ही जेंव्हा सायकल सोडता तेंव्हा तिचे भाडे आपोआप चुकवले जाते, तिला कुलूप लागते इत्यादि. अर्थात जिथे अशी प्रगत व्यवस्था नसते तेथे सायकल स्थानकावर माणसाची नेमणूक केलेली असते आणि त्याच्या कडून ही सायकल देता आणि घेता येते. अशा प्रकारे सायकल वापरासाठी मिळण्याची सहज, सोपी सर्वांना परवडेल अशी व्यवस्था अनेक शहरांमध्ये निर्माण झाली आहे आणि वेगाने निर्माण होत आहे.

किती मजेशीर आहे ना हा सारा प्रकार, एके काळी ज्या सायकल ने शहरांची वाढ सुकर केली, शक्य केली तीच सायकल मध्ये नकोशी झाली, मागे टाकली गेली आणि आता आजच्या आपल्या शहरांना वेगळ्या प्रकारे घडवत आहे!!! अर्थात पहिल्या लेखात मांडल्या प्रमाणे आणखी २० वर्षानंतर सारीच वाहने प्रदूषण रहित सौर ऊर्जेने चालणारी झाली, अधिक गतिमान सार्वजनिक वाहतूक निर्माण झाली आणि लोकांची एकूणच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरजच कमी झाली तर कदाचित सायकलला जे महत्त्व सध्या नव्याने येऊ लागले आहे ते उरणार नाही पण १९ व्या शतकाच्या शेवटच्या भागात आणि २० व्या शतकाच्या पूर्वार्धात सायकल मुळे शहरे कशी शक्य झाली, शहरे कशी वाढली – घडली ते पाहूया ........

Figure 2 - A penny-farthing or ordinary Bicycle 
photographed in the Škoda Auto 
museum in the Czech Republic



इ.स. १८१७ साली जर्मनी मध्ये पहिली दुचाकी अवतरली, बरोन कार्ल द्रिस (Karl Drais) ह्याने ती बनवली होती आणि तिला रनिंग मशीन असे नाव दिले होते. ही दुचाकी लोखंडाची जड फ्रेम, लाकडी चाके आणि सायकल वर बसून पायाने जमिनीला किक मारून चालणारी होती (पहा आकृती १). पॅडल्स च्या तंत्रज्ञानाचा शोध १८६० च्या सुमारास लागला. इ.स. १८६८ मध्ये ह्या दुचाकी साठी बायसिकल आणि तिचाकी साठी ट्रायसिकल हा शब्द इंग्रजी मध्ये रूढ झाला. 

पॅडल्स आणि चेनचे तंत्रज्ञान वापरून १८६८ च्या सुमारास फ्रान्स मध्ये पेनी-फार्दिंग (penny-farthing) म्हणजेच ordinary cycle असे नामकरण केलेली सामान्य सायकल निर्माण करण्यात आली. मागचे छोटे चाक - पुढचे चाक खूप मोठे, , त्यावर बसवलेली सीट अशी ही दुचाकी पॅडल्स  येऊनही चालवणे खूपच पीडा कारक होते म्हणून हिला हाडे खिळखिळी करणारी (boneshakers) असे म्हटले जायचे (पहा आकृती २).

Figure 3 - 1886 Rover safety bicycle at the British 

Motor Museum. The first modern bicycle, it 

featured a rear-wheel-drive, chain-driven cycle with 

two similar sized wheels. Dunlop's pneumatic tire 
was added to the bicycle in 1888
आज जरी सायकल चे तंत्रज्ञान सोपे वाटत असले तरी त्याच्या प्रत्येक भागासाठी पॅडल्स, चेन, फ्रेम, ब्रेक्स, हॅन्डल्स, चाक अनेक प्रकारची संशोधने होत राहिली आणि  दुचाकी मध्ये अनेक सुधारणा होत राहिल्या, निरनिराळी स्वरूपे ती घेत राहिली आणि ह्या साऱ्या साठी जवळजवळ ७० वर्षे लागली .

शेवटी इ.स. १८८५ मध्ये जवळजवळ आज असते त्या स्वरुपाची डायमंड आकाराची फ्रेम, दोन्ही चाके सारख्या मापाची, पॅडल्सचा आणि चेनचा उपयोग करून मागचे चाक चालवणारी अशी सुरक्षित सायकल (safety bicycle) १८८५ च्या सुमारास ब्रिटीश संशोधक जे. के. स्टारले याने तयार केली आणि पाठोपाठ १८८८ ला स्कॉटीश संशोधक डनलॅाप ह्याने हवा भरलेले टायर तयार केले ज्याचा उपयोग करून ही दुचाकी परिपूर्ण झाली (पहा आकृती ३).

मोटर आधारित गाड्या (ऑटोमोबाईल) विकसित होऊन त्यांनी वाहतुकीचे मुख्य साधन म्हणून जागा घेण्याआधी सायकल ने एक प्रकारची वाहतूक क्रांतीच घडवली. सुरवातीला उच्चभ्रू लोकांनी शौक /छंद म्हणून जरी तिचा अवलंब केला तरी एकदा सायकलचे व्यापारी तत्वावर ठोक उत्पादन शक्य झाल्यावर आणि सुरु झाल्यावर काही काळातच ती सर्वसामान्यांचे वाहन ठरली.  एवढेच नव्हे तर सायकलच्या शोधामुळे आणि नंतर वापरामुळे अनेक इतर वैज्ञानिक आणि तांत्रिक शोधांना चालना मिळाली, मोटर गाडी (ऑटोमोबाईल) चा विकास सायकल साठी शोधलेल्या बॉल बेरिंग्स, हवेच्या दाबावर चालणारे टायर्स, स्पोक्स आधारित चाके, चेन इत्यादि मुळे शक्य झाला. सर्वात महत्वाचे म्हणजे देशांच्या अर्थकारणाला ही वाढ मिळाली. अनेक कंपन्या निघाल्या आणि त्यांच्यामध्ये जाहिरात युद्ध ही मोठ्या प्रमाणात घडले (पहा आकृती ४).


Figure – 4 - an ad for Starley's Rover brand).Wiki Commons
सायकल हे माणसाने बनवलेले मनुष्य बळाचा अत्यंत कार्यक्षम वापर करणारे यंत्र आहे. पॅडल्सला व्यक्ति जेवढी शक्ती लावते त्याच्या ९९ टक्के शक्तीचे गती शक्ती मध्ये रुपांतर होते. सर्वसामान्य पणे माणूस तासाला ३ ते ५ की. मी. ह्या वेगाने चालतो. माणूस सहजपणे चालताना जेवढी शक्ती वापरतो तेवढीच शक्ती वापरून सायकल ने तासाला १५ की. मी. वेगाने जाऊ शकतो म्हणजेच सायकलमुळे त्याची कार्यक्षमता तिप्पट होते आणि म्हणूनच सायकल इ.स. १९०० सुमारास मध्यम वर्ग आणि कामगार वर्गाच्या हातात पोचली आणि ह्या सर्व व्यक्तींची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची शक्ती वाढली, स्वतंत्रता वाढली, स्वावलंबिता वाढली. सायकल येण्या आधी एक तर घोडा, खेचर हे व्यक्तिगत वाहतुकीचे साधन होते किंवा घोड्यांनी ओढलेल्या छोट्या – मोठ्या गाड्या (आपल्या येथे बैलगाड्या) सामायिक वाहतुकीचे साधन होत्या.

सायकल आली आणि व्यक्तीच्या हातात (किंवा पायात !!) यंत्र शक्ती आली, त्याला दळणवळणाचे अकल्पित आणि अमर्याद साधन मिळाले.  तो जेवढे चालून शहर फिरू शकत असे त्याच्या तिप्पट किंवा त्याहून अधिक मोठे शहर फिरणे शक्य झाले. सायकलमुळे त्याचे दररोजचे विश्व तिप्पट आकाराचे करणे शक्य झाले म्हणजेच  लोकांना शहराच्या मुख्य विस्तारापासून थोड्या दूर अंतरावर राहणे वा कामासाठी दूर अंतरावर जाणे शक्य झाले आणि ह्यामुळेच त्यावेळच्या शहरांचे वाढणे, मोठे होणे शक्य झाले. 

Figure 5 - Firefighter bicycle- By Pivari.com - 
Own work, CC BY-SA 3.0, https://commons.
सायकलमुळे दुसरा फरक पडला तो रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्याचा. सायकल मुळे १८७० च्या सुमारास अनेक क्लब उदयास आले आणि त्यांनी चांगल्या रस्त्यांची मागणी सुरु केली, आंदोलने केली आणि जेंव्हा सायकलीचा मोठ्या प्रमाणात वापर शक्य झाला – सुरु झाला तेंव्हा अर्थातच सरकारला गुळगुळीत रस्ते बांधणे भाग पडले ज्यांचा नंतर आलेल्या मोटर गाड्यांसाठी उपयोग झाला. अमेरिकेतली पहिला खास सायकलीसाठीचा रस्ता हा इ.स. १८९४ ला कोने आयलंड ते ब्रुकलिन प्रोस्पेक्ट पार्क असा बांधला गेला.  सायकलचा फक्त परिवहन नाही तर इतर कामांसाठी उदा. अग्निशमन सेवेसाठी पण होऊ लागला.


सायकलमुळे अनेक सामाजिक सांस्कृतिक परिणाम ही घडले. मादाम सुसन ब्राऊनेल (१८२०-१९०६) अंथोनी ह्या अमेरिकेतली प्रसिद्ध स्त्री हक्क कार्यकर्त्या आणि समाज सुधारक. त्यांच्या मते सायकलने दुसऱ्या कुठल्याही वस्तूपेक्षा अधिक प्रमाणात स्त्रियांचे सशक्तीकरण / सबलीकरण केले आहे. १९ व्या शतकाचा अंत आणि २० व्या शतकाचा पूर्वार्ध हा काळ स्त्री-पुरुष समतेच्या वाढीचा, समाजाचा बदलाचा काळ होता आणि त्याच काळात सायकलमुळे त्याकाळच्या पाश्चिमात्य शहरांतील स्त्रियांनाही एक चालण्या – फिरण्याचे न भूतो असे स्वातंत्र्य मिळाले साधन मिळाले. मुख्य म्हणजे सायकल चालवण्याच्या निमित्ताने व्हिक्टोरियन कपड्यांपासून मुक्ती मिळाली. अर्थातच त्याकाळच्या पाश्चिमात्य शहरांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनीही सायकलचा अवलंब केला.  त्या काळाच्या जवळजवळ सर्व सायकल जाहिरातींमध्ये स्त्रियांनी सायकल चालविण्याचा संदेश होता, ह्या संकल्पनेवर भर होता.  

शहरांमधील वाढलेली वाहतुकीची कोंडी, वाढलेली प्रदूषण आणि व्यक्तिगत शरीर आरोग्य इत्यादि प्रश्नांचा उपाय म्हणून सायकल वापराला पुन्हा महत्त्व आले आहे आणि जगातील जवळजवळ सर्व मोठ्या शहरांमध्ये ते पसरले आहे, झपाट्याने पसरते आहे. सायकल वापरासाठी शहरांचे नियोजन नव्याने केले जाते आहे, रस्ते नव्या प्रकारे आखण्यात – बांधण्यात येत आहेत आणि सायकलचा वापर सहज पणे करता यावा, ती सहजपणे मिळावी, कमी खर्चात मिळावी ह्या साऱ्या साठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येऊ लागला आहे. भविष्यात शहरे, शहरीकरण प्रक्रिया आणि सारे जगच  संपूर्णपणे शाश्वत विकास आधारित होण्यासाठी जो २० ते ३० वर्षाचा काळ लागणार आहे ह्या कालखंडात सायकल अतिशय महत्त्वाची भूमिका भाजविणार आहे, शहरांना नव्याने घडणार आहे हे निश्चित आहे – काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे  ..... 


[1] Sidewalk Talk series “15 Innovations That Shaped the Modern City.” वर आधारित लेख
[2] लेखात वापरलेली माहिती आणि चित्रे विकिपीडिया आणि विकी कॉमन्स वरून घेतलेली आहे.

No comments:

Post a Comment