Monday, May 7, 2018

शहरे, शहरीकरण, शहरी विकास - लेखांक ३ - आजची शहरे घडविणारे वैज्ञानिक शोध / तंत्रज्ञान – वीज आणि वीज आधारित पथदीप व्यवस्था


शहरे, शहरीकरण, शहरी विकास - लेखांक ३ - आजची शहरे घडविणारे वैज्ञानिक शोध / तंत्रज्ञान वीज आणि वीज आधारित पथदीप व्यवस्था[1][2] ....

आजची शहरे कुठल्या तंत्रज्ञाना मुळे घडली आणि भविष्यात कुठल्या नव्या तंत्रज्ञानापायी त्यांचे स्वरूप बदलेल हे ह्या लेखांतून मांडण्याचा प्रयत्न आहे. कुठलेही तंत्रज्ञान वा वैज्ञानिक शोध शहराला अचानक एका रात्रीत वा काही दिवसात बदलून टाकत नसतो, अनेकदा तर अनेक दशके जातात नवे तंत्रज्ञान खर्या अर्थाने अमलात यायला आणि शहरे बदलायला. उदा. गेल्या लेखात चर्चा केली ते उदवाहनाचे /लिफ्टचे  तंत्रज्ञान अमलात येऊन उंच इमारती बनायला आणि शहरांची रचना बदलू लागायला ५० हून अधिक वर्षाचा काळ जावा लागला. पहिल्या लेखात मांडले त्याप्रमाणे सौर उर्जेचे तंत्रज्ञान येत्या वर्षांमध्ये शहरेच नव्हे तर सारे जग आणि मानवी जीवन बदलून टाकणार आहे पण ह्या तंत्रज्ञानाचा शोध १९५३ मध्ये होऊनही (कॅल्व्हीन फ्युलर, गेराल्ड पिअरसन आणि डॅरील चॅपिन ह्यांनी सिलिकॉन सोलर सेल बनवला आणि सूर्य प्रकाशापासून वीज बनवली – वापरून दाखवली) आताशी कुठे तिचा मोठ्या सार्वत्रिक स्तरावर उपयोग शक्य झाला आहे. शिवाय शहरांची वाढ आणि शहरीकरण ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे, ती भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा अनेक परीबळे एकत्र येऊन घडते त्यामुळे खरे  पाहता नव्या तंत्रज्ञानाचा शहरांवर कसा आणि केंव्हा परिणाम होईल वा भूतकाळात अमुक एका तंत्रज्ञानाचा कसा परिणाम झाला हे सांगणे अवघड आणि धाडसाचे आहे, तरीही अनेकांनी ह्या विषयी विचार केला आहे करत आहेत ते या लेखांमध्ये मांडण्याचा हा प्रयत्न आहे ....

काल – परवाच बातमी आली की भारताच्या सर्व गावांमध्ये वीज पोचली आणि गावामध्ये वीज पोचल्यावर गावकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया, आता त्यांचे आयुष्य कसे बदलून जाईल हे सारे टीव्हीवर निरनिराळ्या वाहिन्यांद्वारे निरनिराळ्या प्रकारे मांडले जाते आहे. ह्या विजेमुळेच एक प्रकारे आजची शहरे शक्य झाली. तसे पहाता वीज नव्हती त्या आधीही छोट्यापासून ते मोठी शहरे होतीच – वाढत होती, बदलत होती आणि लयाला पण जात होती. विजेचा प्रकाश नसला तरी घराघरा मध्ये मनुष्याने प्रकाशाची सोय एका ना दुसऱ्या प्रकारे केलेली होतीच. शहरांमध्ये रस्त्यांसाठी पथदीप व्यवस्था (streetlight system) ही विजेचा शोध लागण्यापूर्वी पण होती.  रस्त्यांवर रात्रीच्या वेळी प्रकाशासाठी पथदीप लावण्याचा पहिला संदर्भ चवथ्या शतकात अन्तिओच ( Antioch) ह्या ग्रीक-रोमन शहराचा मिळतो. नंतरचा संदर्भ मिळतो आठव्या-नवव्या शतकातील कॉर्दोवा (Cordova) ह्या दक्षिण स्पेन मधील मूळ रोमन पण नंतर अरब साम्राज्यातील शहराचा. युरोप मध्ये मध्ययुगीन कालखंडात शहरांमध्ये रात्री मार्ग दाखवायला, एका ठिकाणाहून दुसरीकडे न्यायला दिवा घेतलेले (कंदील घेतलेले) वाटाडे (link boys) असायचे. वाऱ्यापासून ज्योतीचे संरक्षण करू शकतील असे कंदील (lanterns) विकसित झाले आणि पथदीप व्यवस्थेला चालना मिळाली. ई.स. १५२४ च्या सुमारास पॅरिस मध्ये प्रत्येक घरा बाहेर रात्री कंदील लावणे बंधनकारक होते, अर्थात त्याचे पालन फारसे नीट होत नसे. शेवटी १६६९ मध्ये सरकारने पॅरिस च्या सर्व रस्त्यावर कंदील आधारित पथदीप व्यवस्था सुरु केली. कंदील वा तेलाच्या दिव्यांच्या जागी कोळश्यापासून बनवलेल्या गॅस आधारित पथदीप व्यवस्था १८२९ साली पॅरिस मध्ये सुरु झाली आणि मग जगभर पसरली.
अशाप्रमारे वीज येण्याआधी प्रकाशाची व्यवस्था घरांमध्ये आणि शहरांतील रस्त्यांवर होती मग विजेमुळे वेगळे असे काय घडले ? विजेचे तंत्रज्ञान आले आणि शहरे वा शहरीकरण कसे बदलले? ...

१८०२ साली हम्फ्री डॅव्ही (Humphry Davy) ह्या ब्रिटीश शास्त्रज्ञाने वीज प्रकाशाची (विजेची) निर्मिती केली पण त्यापुढे ७० वर्षाहून अधिक काळ आणि अगणित संशोधकांच्या प्रयत्नानंतर १८७९ साली एडिसन ने घरात वापरता येईल असा इंकॅंडेसन्त लाईट बल्ब बनवला आणि त्याचे व्यापारी उत्पादन सुरु केले आणि वीज घराघरात पोचली. त्याच सुमारास १८७६ लॉस अॅन्जेलीस कौन्सिल ने चार आर्क लॅम्प पथदीप (streetlight) म्हणून लावण्यास मंजुरी दिली. १८७८ मध्ये पॅरिस (पहा आकृती १) आणि लंडन मध्ये विजेचे पथदीप लावण्यात आले. शहरांन मध्ये विजेचे पथदीप वापरण्यात अमेरिकेने आघाडी घेतली आणि १८९० साली अमेरिकेत १३०००० आर्क लॅम्प वापरात आले होते. गजानन शर्मा ह्यांनी लिहिलेल्या पुस्तकानुसार आशिया मध्ये आणि भारतामध्ये सर्वप्रथम विजेचे १०० पथदीप ऑगस्ट १९०५ मध्ये बंगळूरू ह्या शहरात लावण्यात आले आणि वर्षभरात त्यांची संख्या ८६१ इतकी वाढविण्यात आली होती. म्हैसूर राज्याचे चीफ इंजिनीअर विल्यम मॅक हटचीन ह्यांनी हे साध्य केले होते.

Figure 1 Demonstration of Yablochkov's arc lamp powered by Zénobe Gramme alternating current dynamos on the Avenue de l'Opera in Paris (1878), the first form of electric street lighting[3]

थोडक्यात २० वे शतक सुरु झाले आणि वीज ही शहरातील व्यापारी, औद्योगिक, सरकारी – खासगी कार्यालये आणि सर्वसामान्यांच्या घरात पोचली; विजेचा उपयोग शहरी सेवेच्या (streetlight – पथदीप व्यवस्था) रुपात होऊ लागला आणि शहरे आणि शहरी जीवन पुढील प्रमाणे आमुलाग्र बदलले ....

वीज आली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणसाला सहजपणे काम करता येण्याचा काळ / वेळ वाढला. प्रकाशाची साधने आधीही होती पण सहजपणे कुठलेही काम करता येईल इतका पुरेसा प्रकाश, माफक खर्चात सामुहिक आणि व्यक्तिगत रित्या देता येईल अशी ती साधने नव्हती. शहरांमध्ये वीज पोचली आणि उशिरा पर्यंत कार्यालये, उद्योग, दुकाने, संस्था आणि घरांमध्ये अर्थार्जनाचे काम करणे शक्य झाले; त्याहून महत्वाचे म्हणजे वीज आधारित पथदीप व्यवस्थेमुळे उशिरा पर्यंत काम करू लागलेल्या लोकांना सुखरूप आणि सुरक्षित पणे कामावर जाणे वा घरी परतणे शक्य झाले. सर्वात महत्वाचे म्हणजे वीज आधारित पथदीप व्यवस्थेमुळे शहरातील आनंद प्रमोदचे रात्रीचे जीवन (night life) शक्य झाले कारण आता सूर्यास्ता नंतरही लोकं सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे येजा करू लागली. हे जे रात्रीचे दळणवळण आणि रंगीत जीवन शक्य झाले त्यामुळे उपहारगृहे आणि सर्व प्रकारच्या मनोरंजन उद्योगाची वाढ झाली.  काम करता येण्याचे तास वाढल्याने शहरांची रोजगार निर्माण करण्याची क्षमता वाढली, शहरात रोजगार वाढले त्यामुळे लोकांचे शहरांकडे स्थलांतर वाढले, शहरांमध्ये जशी जास्त लोकं आली तशी वाढलेल्या लोकांसाठी आणखी लोकांनी शहरांकडे येण्याची गरज निर्माण झाली आणि शहरे सतत वाढत गेली.   ह्या साऱ्याचा एकंदर परिणाम म्हणजे शहरांची संपत्ती निर्माण (economic wealth generation) करण्याची अनेक पटींनी शक्ती वाढली.

विजेच्या क्षेत्रात अजूनही सतत नवी नवी संशोधने चालू आहेत आणि त्यांचाही परिणाम शहरांवर – शहरी जीवनावर होतो आहे. अगदी ताजे असे उदाहरण म्हणजे काही वर्षापूर्वी एल.ई.डी. दिवे (LED Bulbs) आले आणि त्यामुळे विजेचा वापर आणि त्याविषयीचा खर्च कमी करता येणे शक्य झाले. आपण सारे आपल्या घरातील आधीच्या तंत्रज्ञाना वर आधारित दिवे बदलून एल.ई.डी. तंत्रज्ञान आधारित दिव्यांचा अवलंब करू लागलो आहे, गरिबांना आणि सर्वसामान्यांना ते शक्य व्हावे आणि मोठ्या प्रमाणात विजेचा वापर कमी करता यावा म्हणून सरकारने एल.ई.डी दिवे कमी किंमतीत वाटले आहेत. विकसित देशातील शहरे पण ह्या नव्या दिव्यांचा अवलंब खर्च कमी करण्यासाठी करत आहे. भारतात ह्या नव्या तंत्रज्ञानाचा फायदा शहरांमधील पथदीप व्यवस्थेची गुणवत्ता आणि व्याप्ती वाढविण्यासाठी होतो आहे. भारतातील बहुतांशी शहरांमध्ये पथदीप व्यवस्था अतिशय अपुरी आहे ह्याचे एक कारण म्हणजे पथदीप व्यवस्था चालविण्याने येणारे विजेचे बिल. छोट्या शहरांजवळ पुरेसे पैसे नसल्याने शहरामध्ये पथदीप व्यवस्था पुरेशा प्रमाणात लावणे आणि चालविणे शक्य होत नव्हते पण एल.ई.डी दिवे आधारित वा भविष्यातील सौर उर्जा आधारित पथदीप व्यवस्था चालविण्याचा खर्च बराच कमी येणार असल्यामुळे येत्या वर्षांमध्ये भारतातील शहरांमध्ये पथदीप व्यवस्था चांगल्या गुणवत्तेची आणि व्याप्तीची होणार आहे आणि अर्थातच ह्या शहरांचा विकास होणार आहे ......     

मानवी सभ्यतेच्या सुरवातीपासूनच शहरे आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि इतर सर्व प्रकारची संपत्ती निर्माण करणारी केंद्रे होतीच पण विजेच्या उपयोगाने शहरांची ही शक्ती अनेक पटींनी वाढली, त्यांची वाढही गतिमान झाली आणि आज आपण म्हणतो त्याप्रमाणे शहरे देशाच्या, क्षेत्राच्या विकासाची इंजिन झाली ....



[1] Sidewalk Talk series “15 Innovations That Shaped the Modern City.” वर आधारित लेख
[2] लेखात वापरलेली माहिती आणि चित्रे विकिपीडिया आणि विकी कॉमन्स वरून घेतलेली आहे.
[3] By A. Rintel (from partly legible signature in lower left - Emile Alglave; J. Boulard, Thomas O'Conor Sloane, Charles Marshall Lungren (1884) The Electric Light: Its History, Production, and Applications, D. Appleton and company, p. page=26 Retrieved on 9 January 2009., Public Domain, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=5687409

2 comments:

  1. वा! कुसुमाग्रजांच्या ओळी आठवल्या - "नवलाख तळपती दीप विजेचे येथ; उतरली तारकादळे जणू नगरात.."

    ReplyDelete
  2. आपली पूर्वी चर्चा झाली होती त्याप्रमाणे, तेलाचे दिवे किंवा पुढे जाता गॅसचे दिवे पथदीप म्हणून वापरात आल्यामुळेच ते टांगण्यासाठी बांबू किंवा लाकडी खांबांऐवजी लोखंडी 'लॅम्प पोस्ट्स' उभारण्यात आले, ते त्यांना आग लागू शकत नाही म्हणून. पण पुढे विजेचे दिवे आल्यानंतरही धातूचेच खांब वापरात राहिले आणि वीजवाहक असल्याने ते कितीतरी भयानक अपघातांना कारणही ठरले. त्याऐवजी सुहृदच्या म्हणण्याप्रमाणे जर लाकूड/बांबूचा वापर केला तर वीज अपघातांना आळा बसेल.

    ReplyDelete