Friday, August 17, 2018

आजच्या शहरांची नवी आवश्यकता निद्रास्थानांची


बदलत्या काळाबरोबर माणसाच्या, समाजाच्या गरजा बदलतात मग त्या पुऱ्या करण्यासाठी नवे तंत्रज्ञान, नवी व्यवस्था अस्तित्वात येते तर दुसरीकडे तंत्रज्ञान अनेकविध वैज्ञानिक शोधांमुळे बदलते आणि मग ते इतर व्यवस्थांना, माणसांना आणि समाजालाही बदलते. ह्या व्यामिश्र आणि सतत बदलणाऱ्या परिस्थितीची अनुभूती शहरांमध्ये  सर्वप्रथम मिळते.  शहरी जीवनाकडे नीट लक्ष देऊन पहिले हे बदल, ही स्थित्यंतरे त्यातून निर्माण झालेल्या गरजा, त्या पुऱ्या करण्यासाठी बाजार वा सरकारी व्यवस्थेने केलेले उपाय सारे कळून येते. 

शहरांमध्ये आज आपल्याला कुठल्याही वेळेला झोपाळलेली अथवा एक या दुसऱ्या प्रकारे झोप घेताना माणसे दिसून येतात. शाळा, कॉलेज, नोकरी वरून परतणारी माणसे झोपाळलेली असणे, त्यांनी झोप घेणे स्वाभाविक आहे पण सकाळी वा दिवसा दरम्यान शाळा, कॉलेज, नोकरीला वा इतर कुठेही जाताना वाहनांमध्ये (लोकल्स, बसेस, कॅब्स, विमान), वाहनस्थानकांवर माणसे झोप  घेताना दिसून येतात.  अनेकदा मिटिंग मध्ये, नाटक, सिनेमा आणि इतर कार्यक्रमांमध्ये  लोकं डुलकी घेताना दिसतात. ह्या सोबत हे ही दिसून येते की घरातला वेळ सोडल्यास माणसे एकतर कामाच्या ठिकाणी वा वाहनांमध्ये वा वाहनतळांवर मुख्यत्वे असतात - ह्या साऱ्या ठिकाणी जसे जमेल तसे झोपत असतात आणि त्याहून महत्वाचे म्हणजे अशी ही सतत येणारी झोप घालविण्यासाठी कळत - नकळत निरनिराळ्या कॉफी  शॉप्स वा उपाहारगृहांमध्ये  मध्ये वेळी-यावेळी खात पीत  असतात.

जगभर एवढी कॉफी शॉप्स  आणि आपल्या इथे चहाच्या टपऱ्या - ठिकाणे का चालतात वा वाढत आहेत ह्याच्या कारणाचा कधी विचार केला आहे? ती वाढत आहेत अपुऱ्या झोपेमुळे. झोप घालवण्यासाठी कळत - नकळत  चहा - कॉफी प्यायली जाते - झोप टाळण्यासाठी अवेळी फास्ट फूड खाल्ले जाते परिणामी मेदस्वीता वाढते आहे, अपुऱ्या झोपेमुळे उच्च रक्तदाब,  हृदयरोग आणि मानसिक रोग ह्यांचे प्रमाण वाढते आहे. अपुरी झोप हे कारण आहे आजच्या अनेक शहरी जीवनशैली विषयक प्रश्नांचे आणि आजारांचे.  विज्ञानाच्या मते रोज माणसाने सात ते नऊ तास झोप घ्यायला हवी पण आपण सारेच ह्याच्या तुलनेत बरीच कमी झोप घेतो किंवा असेही म्हणता येईल की बदलेल्या परिस्थिती मुळे आपल्याला कमी झोप मिळते - घेता येते. ही बदललेली परिस्थिती कोणती? आजच्या लोकांच्या अपुऱ्या झोपेचे कारण काय? ह्या साठी उपाय तरी काय?

अपुऱ्या झोपेची कारणे म्हणून बहुतेक लोकं  स्मार्ट फोन, टी व्ही. आणि चंगळवादी जीवनशैली कडे बोट दाखवतील. ही कारणे आहेतच पण ह्या कारणांमागचे मुख्य कारण  म्हणजे नोकरी - कामधंदा करणाऱ्यांना (त्यात मुले आणि विध्यार्थी पण आले) कमीत कमी १२ आणि जास्तीत जास्त १८ ते २० तास कामानिमित्य आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासानिमित्य घराबाहेर रहावे लागते. बहुतांशी लोकं काही तासापुरतेच घरी झोपायला जातात. शहरे आता २४ तास जागी असतात, काम करत असतात.  ही  परिस्थिती भारतामध्ये फक्त मुंबईत थेट १९८० च्या सुमारा पासून असल्यामुळे मराठी कथा कवितांमध्ये बापाची आणि मुलांची फक्त रविवारी होणारी भेट - व्यथा मांडली गेली आहे. पण आता मात्र ही परिस्थिती भारताच्या सर्वच मोठ्या शहरात निर्माण झाली आहे. वाढलेल्या स्पर्धात्मकते मुळे, रोज करावे लागणारे १० ते १२ तास काम, कामावर येण्या जाण्यासाठी लागणारा दोन ते चार तासाचा अवधी, दुसऱ्या शहरांमध्ये जाऊन करावे लागणारे काम त्यासाठी वेळी अवेळी  करावा लागणारा विमान वा इतर प्रवास. ही नवी जीवनपद्धती फक्त भारतीय शहरांशी निगडित नाही तर जगातील सर्व शहरांशी निगडित आहे - शहरी जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे.  अशा ह्या नव्या शहरी जीवन पद्धतीच्या अनेक वाईट परिणामांपैकी महत्वाचा पण अत्यंत दुर्लक्षित परिणाम म्हणजे माणसाला मिळणारी अपुरी झोप !! अमेरिकेच्या नॅशनल स्लीप फौंडेशन च्या पहाणी अहवालानुसार ९० टक्क्याहून अधिक अमेरिकन्सनी कामावर काम करताना रात्रीच्या अपुऱ्या झोपेमुळे त्रास होण्याची तक्रार केली तर ३० टक्के अमेरिकन्सनी कामावर असताना झोपण्याची कबुली दिली.

माणसाला मिळणाऱ्या अपुऱ्या झोपेहून अधिक वाईट बाब म्हणजे ही अपुरी झोप अपुरीच राहते कारण एकदा का माणूस घरातून निघाला की घरी परत येईपर्यंत त्याला वेळ मिळाला अथवा तो वेळ काढू जरी शकला  तरी छोटी का होईना पण झोप घेता येईल अशा सोयी - सुविधाच शहरांमध्ये नाहीत. पुरत्या प्रमाणात सोयी सुविधा नसल्यामुळे आपल्या सर्व शहरांमध्ये बहुतांशी स्त्रियांना घरातून बाहेर निघाल्यावर घरी परत येईपर्यंत टॉयलेट ला जाता येत नाही तशीच परिस्थिती झोपता न येण्याविषयी आहे.

माणसांना कामानिमित्य, त्या साठी कराव्या लागणाऱ्या प्रवासानिमित्य १२ तासाहून अधिक बाहेर राहावे लागणे, आवश्यक आराम आणि झोप न मिळाल्यामुळे एकीकडे त्यांना अनेक प्रकारच्या शाररीक-मानसिक व्याधी होणे आणि दुसरीकडे त्यांची उत्पादकता कमी होणे इत्यादि साऱ्याचा उपाय म्हणजे निरनिराळ्या वाहनतळांवर, इतर सार्वजनिक ठिकाणी, ऑफिसेस, कॉलेजिस, युनिव्हर्सिटीज, मॉल्स मध्ये आणि इतर कामांच्या ठिकाणी माफक दर आकारणारी वा निशुल्क सार्वजनिक आणि खाजगी निद्रास्थाने असावयास हवी. अशी निद्रास्थाने जिथे जाऊन माणूस अर्ध्या तास ते काही तास शांत - स्वच्छ झोप घेऊन ताजा तवाना  होऊ शकेल.

भारतात काही मोठ्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी ही सोय मर्यादित प्रमाणात अगदी पूर्वी पासून होती; अर्थात वर मांडलेला विचार त्यामागे नव्हता आणि आजही रेल्वे स्थानकांवर पुरेशी सोय नाही त्यामुळे फलाटावर लोकं सर्रास झोपलेली दिसून येतात. बस स्थानकांवर अशी सोय आधीही नव्हती आत्ताही नाही मात्र भारतात काही नव्या विमानतळांवर अशी सोय सुरु झाली आहे, जिथे काही तासापुरती झोपण्याची जागा मिळते पण इतर ठिकाणी मात्र अशी सोय नाही.

नुसती सुविधा निर्माण होणे पुरेसे नाही, निद्रास्थानांसोबत ह्या विषयी राष्ट्रीय नीति आणि सामाजिक मान्यता असावयास हवी. उदा. नोकरीच्या वेळेत झोपणे वा शाळेत झोपणे वा कॉलेजमध्ये झोपणे हे सध्याच्या संबंधित नियमानुसार दंडनीय वर्तन ठरते आणि अशा वर्तनाला समाजमान्यता पण खूपच कमी झली आहे पण पूर्वी ती होती म्हणजे दुपारच्या झोपेला - वामकुक्षीला आपल्या इथे सर्व क्षेत्रात मान्यता होती, (कचेऱ्या, दुकाने अधिकृत पणे दुपारी बंद असायची ) पण आज ती मान्यता नाही उलट विनोदाचा विषय झाली आहे.

अपुऱ्या झोपेच्या प्रश्नाविषयी आपल्या इथे विचार होत नसला, त्यासाठी सोयी सुविधा निर्माण होत नसल्या तरी इतर काही देशात -शहरात आता विचार होऊ लागला आहे. शहरात निद्रास्थाने - निद्रालये  असावयास हवी हा विचार सर्वसामान्यांना माहित नसेल पण इतर देशांमध्ये खासगी क्षेत्राद्वारे अमलात येऊ लागला आहे. लंडन येथे तासाला २३ डॉलर ह्या दराने छान, स्वच्छ, सुगंधी जागा झोपण्यासाठी मिळू लागली आहे. ह्या सुविधेला sleeping pods  असे परदेशात म्हटले जाते. न्यूयॉर्क ते माद्रिद अशा अनेक शहरांमध्ये अशी निद्रास्थाने (sleeping pods ) भाड्याने उपलब्ध झाली आहेत. लॉस अँजेलिस आणि इतर अनेक शहरात मॉल मध्ये अशी निद्रास्थाने (sleeping pods ) आहेत. किती नशीबवान आहेत नवरे लॉस अँजेलिस आणि इतर शहरांमधले जिथे मॉल मध्ये निद्रास्थाने आहेत. बायको मॉल मध्ये खरेदी करताना त्यांना जाऊन झोपणे शक्य आहे आपल्याइथे मॉल मध्ये साधी बसायला ही जागा नसते !!!  सांगायला आनंद म्हणजे भारतात पहिल्यांदा मुंबईत अर्बनपॉड (URBANPOD ) नावाने हॉटेल सुरु झाले आहे. अर्थात त्यामध्ये संपूर्ण रात्र  झोपायला कोणाला आवडेल हा प्रश्नच आहे.

राष्ट्रीय नीति किंवा नियमांचा विचार करता चीन, विएतनाम, जपान, फिलिपाईन्स आणि इतर दक्षिण पूर्वेच्या देशांमध्ये त्याच प्रमाणे स्पेन, इटली, ग्रीस, मेक्सिको, कोस्टा रिका, ईक्क़ादोर, नायजेरिया इत्यादि देशांत दुपारच्या झोपेला अधिकृत मान्यता आहे, त्या प्रमाणे विश्रांती दिली जाते आणि कंपन्यांद्वारे कामदारांसाठी तशा सुविधा निर्माण केल्या जातात.  थोडक्यात आपल्या येथे सार्वजनिक ठिकाणी तर अशी निद्रास्थाने निर्माण व्हायला हवी पण त्याच बरोबर ती कामाच्या ठिकाणी पण सुरु व्हायला हवी, दिवसभरात कामाच्या वेळात अथवा सुरवातीला वा संपल्यावर अशी छोटीशी झोप घेता येण्यासाठीची नीती, नियम प्रत्येक कंपनीने योग्य रित्या अमलात आणायला हवे.

निद्रास्थाने ही आजच्या शहरी जीवनाची नव्याने निर्माण झालेली गरज आहे ती लक्षात घेऊन योग्य पावले नाही घेतली वा दुर्लक्ष केले तरी ही गरज वाढतच जाईल आणि बाजार व्यवस्था त्याला प्रतिसाद देईलच पण जेंव्हा फक्त बाजार व्यवस्था एखादी गरज पूर्ण करावयाचा प्रयत्न करते तेंव्हा त्या अंगीभूत असमानता असते - सर्वसमावेशकता नसते आणि म्हणूनच सर्वांनी (सरकार, खाजगी क्षेत्र, गैरसरकारी स्वयंसेवी संस्था) ह्या विषयी प्रयत्न करावे लागतील.